
भारतीय कसोटी संघात विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण नवा कर्णधार शुभमन गिलने या क्रमांकाची जबाबदारी घेत ती इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात समर्थपणे पेलली देखील आहे. त्यामुळे चौथा क्रमांक गिलला मानवल्याचे दिसत आहे.
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून नेतृत्वाला सुरुवात करण्यासोबतच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात शतके करताना त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दोन खेळीही केल्या.