

Cristiano Ronaldo
Sakal
Cristiano Ronaldo World Cup Journey Ends: तब्बल २३ वर्षे एका खेळाडूने संपूर्ण देशाच्या अपेक्षा आपल्या खांद्यावर वाहिल्या. सहा युरोपियन चॅम्पियनशिप, सहा फिफा विश्वचषक आणि जवळपास दोन दशकांची कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या फुटबॉल इतिहासात अजरामर ठसा उमटवला आहे. २०२६ हा आपला अखेरचा फिफा विश्वचषक असे जाहीर करताच, पोर्तुगालसह संपूर्ण फुटबॉल विश्व त्याच्या अतुलनीय आणि विक्रमांनी सजलेल्या कारकिर्दीला सलाम करत आहे.
२० ऑगस्ट २००३ रोजी कझाकस्तानविरुद्ध १८ वर्षीय तरुण म्हणून रोनाल्डोने पोर्तुगालकडून पदार्पण केले. त्यानंतर फार काळ न लागता युरो २००४ स्पर्धेत ग्रीसविरुद्ध त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला. सुरुवातीपासूनच त्याच्यातील नेतृत्वगुण ओळखले गेले आणि युरो २००८ पूर्वी त्याची अधिकृतपणे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्याने ही जबाबदारी अभिमानाने पार पाडली आहे.