
क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्स क्रिकेट मैदानात भारत आणि इंग्लंड संघ गुरुवारपासून (१० जुलै) आमने-सामने येणार आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा आणि महत्त्वाचा सामना आहे. या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी असल्याने आघाडी घेण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी लॉर्ड्सवर होणारा हा सामना महत्त्वाचा समजला जात आहे.
दरम्यान, मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व दिसले होते, पण तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.
इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ त्यांचे वेगवान आक्रमण कसं वापरणार हे या सामन्यात पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय जोफ्रा आर्चर विरुद्ध जसप्रीत बुमराह हे समीकरण या सामन्याचे आकर्षण असणार आहे.