आशिया चषक २०२५ साठी जाहीर झालेल्या भारतीय संघातून श्रेयस अय्यर व यशस्वी जैस्वालला पुन्हा वगळण्यात आले.
माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर व आर. अश्विनसह अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर जोरदार टीका केली.
अश्विनने निवडकर्त्यांना सुनावताना म्हटले की श्रेयस-यशस्वी यांची निस्वार्थी खेळीच त्यांना शिक्षा ठरली.
RAVI ASHWIN ON SHREYAS IYER & YASHASVI JAISWAL & NOT PICKED FOR ASIA CUP: आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या संघातून पुन्हा एकदा श्रेयस अय्यरला दूर ठेवण्यात आले आणि क्रिकेट चाहत्यांची तळपायातली आग मस्तकात गेली... अभिषेक नायरसह अनेक माजी खेळाडूंनी निवड समितीच्या निर्णयावर टीका केली. भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन जो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याने तर श्रेयस आणि यशस्वी जैस्वाल यांना डावलण्याच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. त्याने श्रेयस व यशस्वी यांच्या निस्वार्थी खेळीची ही शिक्षा असल्याचे मत व्यक्त करून निवड समितीला शाल जोडीतून जोडे मारले.