T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

India Women beat Pakistan in T20 World Cup 2026: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या विजयात दिप्ती शर्माने ५ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
Women's T20 World Cup | India vs Pakistan

Women's T20 World Cup | India vs Pakistan

Sakal

Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली आहे. रविवारी (१४ जून) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी क्रिकेट संघाला ६४ धावंनी पराभूत करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या विजयात स्मृती मानधना, रिचा घोष, दीप्ती शर्मा, श्री चरणी यांनी मोलाचा वाटा उचलला. दीप्तीने ५ विकेट्स घेत स्पर्धेला दमदार सुरुवातही केली.

या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला १७ षटकात सर्वबाद १०६ धावाच करता आल्या. पाकिस्तानसाठी मुनीबा अलीने एकाकी झुंज दिली. दरम्यान भारताचा हा पाकिस्तानविरुद्धचा टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला.

या सामन्यात पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि गल फेरोझा यांनी सुरूवात चांगली केली होती. त्यांच्यात ३८ धावांची भागीदारीही झाली. त्यांना बाद करण्याच्या काही संधी सुरुवातीला भारताकडून सुटल्या, पण अखेर ५ व्या षटकात फेरोझाला दीप्ती शर्माने भारती फुलमालीच्या हातून झेलबाद केले. फेरोझा १२ धावावंर बाद झाली. त्यानंतर मात्र पाकिस्तानने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ७ व्या षटकात आयेशा जफरला दीप्ती शर्मानेच १२ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर सायरा जाबीनला ८ व्या षटकात श्री चरणीने माघारी धाडले.

मात्र मुनीबा अली चांगली फलंदाजी करत होती. पण तिचा अडथळा दीप्ती शर्माच्या अफलातून डायरेक्ट थ्रोने दूर केला. मुनीबा ११ व्या षटकात नतालिया परवेझसोबत धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना दीप्ती शर्माने स्ट्रायकरच्या दिशेने चपळाईने चेंडू फेकला, तो चेंडू मुनीबा क्रीजच्या आत येण्यापूर्वीच स्टंपवर आदळला. त्यामुळे मुनीबाला ३५ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावांवर माघारी परतावे लागले. १२ व्या षटकात कर्णधार फातिमा सनाचा अडथळा शफाली वर्माने दूर केला. तिच्या गोलंदाजीवर स्मृती मानधनाने शून्यावर फातिमाचा झेल घेतला. १३ व्या षटकात नतालियाला श्री चरणीने ७ धावांवर बाद केलं, तर १५ व्या षटकात रमीन शमिमलाही श्री चरणीनेच ४ धावांवर बाद केलं. तिचा अफलातून झेल श्रेयंका पाटिलने घेतला. त्यानंतर १७ व्या षटकात दीप्ती शर्माने अलिया रियाझ (१८), तस्मिया रुबाब (०) आणि नाशरा संधू (४) यांना बाद करत पाकिस्तानचा डाव संपवला.

भारताकडून दीप्तीने ४ षटकात १० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच श्री चरणीने ३ विकेट्स घेतल्या, तर शफाली वर्माने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७० धावा केल्या होत्या. भारताकडून उपकर्णधार स्मृती मानधनाने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने आक्रमक खेळ केला. तिने १७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला १७० धावांपर्यंत पोहचता आले.

पाकिस्तानकडून सदिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तस्मिन रुबाब आणि रमीन शमिम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com