

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेवर बुधवारी (७ मे) दुसऱ्यांदा मात केली.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला २३ धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारताने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताने या मालिकेत साखळी फेरीत ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. अंतिम सामना रविवारी (११ मे) होणार आहे.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ३३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात ७ बाद ३१४ धावाच करता आल्या.