
भारतीय संघाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत करत उपांत्य फेरीत जवळपास स्थान पक्के केले आहे, तर पाकिस्तानच्या संघाचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे, तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे.
तरी आता उद्या (२४ फेब्रुवारी) होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर अ गटातून उपांत्य फेरीत कोण पोहचेल, याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकते.
तथापि, पाकिस्तान आणि विजय यांच्यात पुन्हा एकदा विराट कोहलीच खंबीरपणे उभा राहिल्याचे रविवारीही दिसले. विराटने आत्तापर्यंत अनेकदा पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी केली आहे. रविवारी देखील त्याचा प्रत्येय चाहत्यांना आला.
विराटने शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याकडूनही चांगली साथ मिळाली. त्यांनी पाकिस्तानला या सामन्यात वर्चस्व गाजवण्याची संधीच दिली नाही.