

Irfan Pathan
Sakal
इरफान पठाण
२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून टी-२० विश्वकरंडक जिंकला तेव्हा भारताने उभारलेल्या १५७ धावांची राखण करताना इरफान पठाणने चार षटकांत फक्त १६ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले होते. अंतिम सामन्याचा मानकरी ठरला होता इरफान पठाण. तोच इरफान पठाण ‘सकाळ’च्या वाचकांना टी-२० क्रिकेटमधले गोलंदाजांचे स्थान समजावून सांगतोय...
तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण २००७ मधील पहिल्यावहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अगोदर आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० या प्रकारात खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी मी एक होतो. मला आठवते, २००५ला मी इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला गेलो होतो. मिडलसेक्स संघाकडून खेळताना मी त्या वेळी सहा टी-२० सामने खेळलो होतो. मजा आली होती. गोलंदाजी करताना फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो आहे हे बघून मला त्या प्रकारच्या क्रिकेटचे वेगळेपण जाणवले होते.
तसेच सतत फलंदाज आक्रमक विचारात असल्याने गोलंदाज म्हणून मला संधी असल्याचे दिसत होते. मी त्या वेळी सतत फलंदाजाला बाद कसे करता येईल, याचाच विचार करून गोलंदाजी करत होतो. तसेच मारा करताना फक्त चेंडू स्विंग करण्यापेक्षा कधी कट करता येतोय का किंवा वेगामध्ये विविधता आणून फलंदाजाला चकवता कसे येईल, याचा विचार करत होतो. टी-२० क्रिकेट पहिल्यांदा खेळत असूनही मला गोलंदाज म्हणून इतक्या युक्त्या कशा काय माहीत याचे इंग्लंडमधील खेळाडूंना आश्चर्य वाटत होते.