
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने गमावली, पण त्याचसोबत भारताला मोठा धक्काही बसला. तो असा की या मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट्स घेतलेला जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये पाचवा कसोटी सामना खेळताना पाठीची दुखापत झाली.
त्यामुळे या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजीही केली नाही. आता यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे. कारण २२ जानेवारीपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे.
त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ युएईला जाणार आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता जवळपास केवळ एक महिन्याचा कालावधी भारतीय संघाकडे आहे. अशात भारतीय संघाला बुमराहच्या दुखापतीची चिंता सतावत आहे.