
India vs Ireland 2nd ODI Women: भारतीय महिला संघ सध्या आयर्लंड महिला संघाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मलिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना रविवारी (१२ जानेवारी) राजकोटला खेळला जात आहे. या सामन्यात खेळताना जेमिमाह रोड्रिग्सने शतक करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताने या सामन्यात आयर्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने ५० षटकात ५ बाद ३७० धावा केल्या.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सलामीला कर्णधार स्मृती मानधाना आणि प्रतिक रावल यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीपासूनच आयर्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी दीडशतकी भागीदारी २० षटकांच्या आतच पूर्ण केली. त्या दोघींनीही अर्धशतके केली. मात्र लागोपाठच्या चेंडूवर या दोघीही बाद झाल्या. मानधनाला १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ओरला प्रेडरगास्टने बाद केले. मानधनाने ५४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. तसेच २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रतिका रावलला जॉर्जिना डेम्पसीने ६७ धावांवर बाद केले. तिने ६१ चेंडूत ही खेळी करताना ८ चौकार आणि १ षटकार मारला.
या दोघी बाद झाल्यानंतरही हर्लिन देओल आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी डाव सांभाळत दीडशतकी भागीदारी केली. त्यांनीही या भागीदारीदरम्यान अर्धशतके पूर्ण केली होती. तसेच त्या शतकेही करतील असे चित्र दिसत होते. मात्र ४८ व्या षटकात अर्लिन केलीने आयर्लंडला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तिने हर्लिनला ८९ धावांवर लॉरा डेलानीच्या हातून झेलबाद केले. हर्लिनने १२ चौकारांसह ८४ डावात ही खेळी केली. त्यानंतर ऋचा घोषही १० धावांवर बाद झाली. पण त्यानंतरही जेमिमाह चांगली खेळत होती तिने ५० व्या षटकात शतकही पूर्ण केले. पण शतकानंतर ती पुढच्याच चेंडूवर बाद झाली. तिने ९१ चेंडूत १२ चौकारांसह १०२ धावा केल्या. तिचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. यापूर्वी कधीही तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले नव्हते. तिच्या शतकामुळे भारताने ३७० धावांचा टप्पा गाठला.
या शतकी खेळीदरम्यान जेमिमाहने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तिने वनडेमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. ती महिला वनडेमध्ये १००० धावा पूर्ण करणारी ११ वी भारतीय फलंदाज ठरली आहे. तिने ४१ सामन्यांतील ४० डावात १००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ती महिला वनडेमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा करणारी भारताची चौथ्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे. तिने अंजू जैन यांच्या ४२ डावातील १००० धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
महिला वनडेमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर मिताली राज आणि दीप्ती शर्मा संयुक्तरित्या आहेत. त्यांनी प्रत्येकी २९ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या. गुसऱ्या क्रमांकावर जया शर्मा आणि हरमनप्रीत कौर संयुक्तरित्या आहेत त्यांनी ३० डावात १००० धावांचा टप्पा गाठला होता. तिसऱ्या क्रमांकावर स्मृती मानधना असून तिने ३३ डावात १००० धावा केल्या होत्या. त्यानंतर आता या यादीत चौथ्या क्रमांकावर जेमिमाह रोड्रिग्स आली आहे.
महिला वनडेमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाज
२९ डाव - मिताली राज
२९ डाव - दीप्ती शर्मा
३० डाव - जया शर्मा
३० डाव - हरमनप्रीत कौर
३३ डाव - जेमिमाह रोड्रिग्स
४० डाव - जेमिमाह रोड्रिग्स
४२ डाव - अंजू जैन
४२ डाव - पुनम राऊत
४३ डाव - अंजूम चोप्रा
५७ डाव - एच काला
९७ डाव - झुलन गोस्वामी