आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर बिग बॅश लीग (BBL) खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
तो BBL खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू ठरू शकतो.
मेलबर्न स्टार्स किंवा मेलबर्न रेनेगेड्स या फ्रँचायझींमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने नुकतीच इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला या वर्षाच्या सुरुवातीलाच रामराम केला होता आणि आता त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी भारतात तरी कोणतंच व्यासपीठ नाही. त्यामुळे निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यानं आणखी एक धाडसी पाऊल टाकण्याची तयारी दर्शवली आहे. अश्विन सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत चर्चा करत आहे आणि तो बिग बॅश लीग ( BBL) खेळण्याच्या तयारीत आहे. जर सर्व बोलणी योग्य झाल्यास ऑस्ट्रेलियातील या ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरेल. ही गोष्ट दोन्ही देशांसाठी मोठी असेल.