Sri Lanka vs Bangladesh 1st Test: बांगलादेशच्या ४९५ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान श्रीलंकेने सडेतोड उत्तर देताना ९० षटकांत ४ बाद ३६५ धावा केल्या आहेत. गॅल येथे सुरू असेलल्या या कसोटीची खेळपट्टी पाटा असल्याने धावांचा पाऊस पडताना दिसतोय आणि त्यावरून सामन्यानंतर प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित केले जातील. पण, हा सामना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू अँजेलो मॅथ्यूज ( Angelo Mathews ) याच्या १८ वर्षांच्या कारकीर्दिचा शेवटचा होता. यात पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर देऊन त्याचे स्वागत केले. तर आज जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा बांगलादेशच्या खेळाडूंनीही टाळ्यांचा कडकडाट करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा तोच बांगलादेशचा संघ आहे, ज्यांनी याच मैदानावर मॅथ्यूजला टाईम आऊट करून मैदानाबाहेर हाकलले होते.