T20 Cricket World Cup 2024 : युगांडाचा पहिला विजय

युगांडा क्रिकेट संघाने गुरुवारी टी-२० विश्‍वकरंडकातील पहिल्या विजयाला गवसणी घातली. टी-२० विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या युगांडाने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर तीन विकेट राखून विजय मिळवला.
T20 Cricket World Cup 2024
T20 Cricket World Cup 2024sakal

प्रोव्हिडेन्स ­: युगांडा क्रिकेट संघाने गुरुवारी टी-२० विश्‍वकरंडकातील पहिल्या विजयाला गवसणी घातली. टी-२० विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या युगांडाने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर तीन विकेट राखून विजय मिळवला. पीएनजी संघाचा क गटातील हा सलग दुसरा पराभव ठरला. ३३ धावा करणारा रियाजत अली शाह हा सामन्याचा मानकरी ठरला.

पीएनजीकडून युगांडासमोर ७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले, पण नॉर्मन वनुआ व ए. नाओ यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे पीएनजी संघाने युगांडाचे पाच फलंदाज २६ धावांवरच बाद करीत विजयाची आशा कायम ठेवली, पण रियाजत शाह (३३ धावा) व जुमा मियागी (१३ धावा) या जोडीने ३५ धावांची भागीदारी करताना युगांडाला विजयासमीप नेले.

रियाजतला या लढतीत जीवनदानही मिळाले. त्याच्या बॅटला लागून चेंडू स्टंपच्या वरून गेला, तसेच नवव्या षटकात चार्ल्स अमिनी याने त्याचा झेलही सोडला, मात्र जुमा व रियाजत विजयासाठी काही धावा बाकी असताना बाद झाले. केनेथ वैसवा याने नाबाद सात धावा करीत युगांडाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी पीएनजीचा डाव १९.१ षटकांत ७७ धावांवर आटोपला.

४३ वर्षीय फ्रँकोचा विक्रम

युगांडाचा ४३ वर्षीय फिरकी गोलंदाज फ्रँको सुबुगा याने चार षटके गोलंदाजी करीत दोन षटके निर्धाव टाकली आणि फक्त चारच धावा दिल्या. पीएनजी संघाचे दोन फलंदाजही त्याने बाद केले. टी-२० विश्‍वकरंडकात चार षटकांमध्ये कमीतकमी धावा देणारी ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

संक्षिप्त धावफलक : पापुआ न्यू गिनी - १९.१ षटकात सर्व बाद ७७ धावा (हिरी हिरी १५, फ्रँक सुबुगा २/४, जुमा मियागी २/१०, अल्पेश रामजानी २/१७, कॉसमस क्वेअुता २/१७) पराभूत वि. युगांडा १८.२ षटकांत सात बाद ७८ धावा (रियाजत अली शाह ३३, जुमा मियागी १३, ए. नाओ २/१६, नॉर्मन वनुआ २/१९).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com