राष्ट्रकुल पदकविजेती कृष्णा लफंग्यांना पकडते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

जयपूर - राष्ट्रकुल पदकविजेती कृष्णा पुनिया खेळाच्या मैदानावरच केवळ हीरो ठरलेली नाही; तर रिअल लाइफमध्येही ती हीरो ठरली आहे. दोन लहान मुलींची छेड काढत असलेल्या लफंग्यांपैकी एकाला चोप दिला. ही घटना राजस्थानमधील चुरू या लहानशा शहरात नववर्षाच्या सुरवातीलाच घडली.

जयपूर - राष्ट्रकुल पदकविजेती कृष्णा पुनिया खेळाच्या मैदानावरच केवळ हीरो ठरलेली नाही; तर रिअल लाइफमध्येही ती हीरो ठरली आहे. दोन लहान मुलींची छेड काढत असलेल्या लफंग्यांपैकी एकाला चोप दिला. ही घटना राजस्थानमधील चुरू या लहानशा शहरात नववर्षाच्या सुरवातीलाच घडली.

कृष्णा पुनिया आपल्या गाडीतून जात होती. रेल्वे क्रॉसिंगजवळ तिला सिग्नलमुळे थांबावे लागले. त्या वेळी तीन तरुण मुले दोन मुलींची छेड काढत असल्याचे तिने पाहिले. लगेचच गाडीच्या बाहेर येऊन तिने त्या मुलांचा पाठलाग केला. ही तिन्ही मुले बाइकवरून पळण्याचा प्रयत्न करत होती. धावत जाऊन कृष्णाने एका मुलाला खाली पाडले.

या दोन मुलींना त्रास देत असल्याचे मी पाहिले. या दोन्ही मुली मला माझ्या मुलींप्रमाणे होत्या; त्यामुळे मी कसलीही पर्वा न करता त्या मुलांकडे धावत गेले, असे कृष्णाने सांगितले.

कशी होणार महिलांची सुरक्षा?
या तीनपैकी एका मुलाला पकडल्यावर मी पोलिसांना फोन केला; परंतु ते नेहमीप्रमाणे बऱ्याच वेळानंतर घटनास्थळी आले. घटनास्थळापासून पोलिस ठाणे अवघ्या दोन मिनिटांवर आहे. मी दोनदा फोन केला; त्यानंतर पोलिस येथे आले, असे कृष्णाने सांगून पोलिसांवर टीका केली. पोलिस इतके उशिरा येत असतील तर महिलांची सुरक्षा कशी होणार, अशी खंतही तिने व्यक्त केली.

कृष्णाने 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवलेले आहे.

अशा घटनेपासून संरक्षण होण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. महिलांवर अत्याचार होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये, अशा घटना घडत असताना आपल्याकडे मोजकेच लोक पुढे येऊन प्रतिकार करतात. बहुतांशी बघ्याची भूमिका घेतात ही आपल्याकडची शोकांतिका आहे.
- कृष्णा पुनिया, राष्ट्रकुल पदकविजेती

Web Title: criminal arrested by krishna poonia