
CWG2022 :लांब उडीत भारताच्या मुरली शंकरने रचला इतिहास, जिंकले रौप्यपदक
भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत ८.०८ मीटर अंतरासह ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय हा लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली.(Murali Shankar for winning the first ever silver medal in Long Jump for India)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला. श्रीशंकरला पदक मिळवण्यात यश आले. पण हे यश श्रीशंकरला खडतर संघर्षानंतर मिळाले आहे. कारण श्रीशंकरची चौथ्या प्रयत्नात ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. पण त्याने हार मानली नाही आणि पुढच्या प्रयत्नामध्ये त्याने नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
चौथ्या प्रयत्नात नेमकं घडलं काय
श्रीशंकरने ८ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारली होती, पण लँडींग बोर्डवर १ सेंटीमीटरच्या फरकाने त्याचा हा प्रयत्न वैध नसल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे श्रीशंकरचा हा प्रयत्न अवैध ठरवला गेला. श्रीशंकर त्यावेळी थोडासा निराश दिसला खरा, पण त्याने हार मानली नाही. पाचव्या प्रयत्यामध्ये त्याने ही कसर भरून काढली.
या स्पर्धेत श्रीशंकर ८.३६ मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदारात आघाडीवर होता. पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बहामासच्या लॅक्यून नैर्नेने या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रीशंकर आणि त्याच्यामध्ये चांगलीच स्पर्धा रंगली. ८.०८ मीटरसह संयुक्तपणे सुवर्णपदकासाठी श्रीशंकर व नैर्न हे दावेदार होते. श्रीशंकरचा सहावा प्रयत्न फाऊल ठरला, परंतु त्याने रौप्यपदक निश्चित केले. नैर्नला सुवर्णपदक मिळाले.