Dasun Shanaka :ये इनिंग खतम काहे नही होता बे.... शानकाने भारताचा शेवट केला कडू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasun shanaka IND vs SL 1st ODI

Dasun Shanaka :ये इनिंग खतम काहे नही होता बे.... शानकाने भारताचा शेवट केला कडू!

Dasun shanaka IND vs SL 1st ODI : भारताचे 374 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने झुंजार शतक (नाबाद 108) ठोकत भारताला विजयासाठी 50 व्या षटकापर्यंत फरफरट नेले. त्याने नवव्या विकेटसाठी रजिथासोबत नाबाद शतकी धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला 50 षटकात 8 बाद 306 धावांपर्यंत पोहचवले. अखेर भारताने सामना 67 धावांनी जिंकला. भारताकडून वेगवान गोलंदाजांची चांगला मारा केला होता. उमरान मलिकने 57 धावात 3 तर मोहम्मद सिराजने 30 धावात 2 बळी टिपले. त्यांना चहल, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

हेही वाचा: Yuzvendra Chahal : 1, 0, 6, 6, 4, W.... दोन लेग स्पिनरमध्ये जुंपली; अखेर श्रेयस अय्यरने...

भारताचे 374 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने पहिल्या 5 षटकातच दोन धक्के दिले. सिराजने अविष्का फर्नांडोला 5 तर कुसल मेंडीसला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था 5.3 षटकात 2 बाद 23 धावा अशी केली. यानंतर उमरान मलिकने देखील चरिथ असलंकाला 23 धावांवर बाद करत लंकेला तिसरा धक्का दिला.

यानंतर सलामीवीर पथुन निसंका आणि धनंजया डि सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. निसंकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोहम्मद शमीने धनंजया डि सेल्वाला 47 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर उमरान मलिकने सलामीवीर निसंकाला 72 धावांवर बाद करत भारताला 5 वे यश मिळवून दिले.

यानंतर चहलने हसरंगाला (16) आणि उमरानने दुनिथला (0) बाद करत लंकेची अवस्था 7 बाद 179 अशी केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने करूणारत्नेला 14 धावांवर बाद करत सामना जवळ आणला होता.

हेही वाचा: Umran Malik : उमरान मलिकने वनडेतही रचला इतिहास; कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं

मात्र श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने पुन्हा एकदा चिवट फलंदाजी केली. त्याने रिजिताला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय संघाला झुंजवले. त्याने लंकेला 300 धावांच्या जवळ पोहचवले. शानकाने 88 चेंडूत नाबाद 108 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळेच लंकेला 50 षटकात 8 बाद 306 धावांपर्यंत मजल मारता आली.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकात 7 बाद 373 धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 धावात 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 10 षटकात 88 धावा देत 3 बळी टिपले.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त