World Cup 1983 : क्रिकेटची सत्ता पालटणारा 'कॅच'

मुकुंद पोतदार
मंगळवार, 25 जून 2019

कोणत्याही खेळात काही क्षण असे असतात, की ते स्मृतिपटलावर कायमचे कोरले जातात. विश्वाकरंडक क्रिकेट म्हटल्यावर अशा असंख्य आठवणी
रुंजी घालतात. त्यातही एक भारतीय म्हटल्यावर 1983च्या वर्ल्ड कपमध्ये असे असंख्य क्षण आहेत.

कोणत्याही खेळात काही क्षण असे असतात, की ते स्मृतिपटलावर कायमचे कोरले जातात. विश्वाकरंडक क्रिकेट म्हटल्यावर अशा असंख्य आठवणी
रुंजी घालतात. त्यातही एक भारतीय म्हटल्यावर 1983च्या वर्ल्ड कपमध्ये असे असंख्य क्षण आहेत. यातील निर्णायक क्षण म्हणजे कपिलदेवने लॉर्डसवरील अंतिम सामन्यात व्हीव रिचर्डसचा घेतलेला "कॅच' !
मदनलालचा चेंडू रिचर्डसने उंच मारला.

कपिलला पाठीमागे पाहात मिडविकेटच्या दिशेने धावायचे होते. सुमारे 18-20 यार्ड अंतर होते. या "कॅच'वर क्रिकेटच्या महासत्तेची मक्तेदारी अवलंबून होती, तर दुसरीकडे "डार्क हॉर्स'ची स्वप्नवत घोडदौडही ठरणार होती. भारताला 183 पर्यंत माफक धावसंख्येत रोखल्यानंतर विंडीजचा विजय "फॉरमॅलिटी' वाटत होता; पण भारतीय संघ हार मानण्यास तयार
नव्हता. त्या स्पर्धेची सुरवात ज्या वेस्ट इंडीजला हरवून केली होती, त्याच मातब्बर संघाला हरवून विश्व्विजेतेपद पटकाविण्याची सुवर्णसंधी होती. मिडॉनहून मिडविकेटला धावणाऱ्या कपिलवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या....आणि कपिलने "कॅच' घेतला! हा "कॅच' भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक आख्यायिका ठरला आहे. याविषयी दस्तुरखुद्द कपिलने आठवणी सांगितल्या आहेत. एखाद्या "सुपरहिट' चित्रपटाची "स्टोरी'
कितीही ऐकली तरी कंटाळा येत नाही, तसेच या "कॅच'चे आहे. मुळात ती "ओव्हर' टाकण्याचा "हट्ट' मदनलालने केला. त्याने कर्णधार कपिलच्या हातून चेंडू जवळपास हिसकावून घेतला. याविषयी कपिल म्हणतो, "एखाद्या गोलंदाजाला इतका आत्मविश्वापस वाटत असेल तर त्याला संधी देऊन पाहिली पाहिजे, असे मला वाटले.'

प्रत्यक्षात मदनलाल मध्यमगती गोलंदाज होता आणि त्याचा चेंडू बॅटपर्यंत पोचण्यापूर्वी रिचर्डस दोन "शॉट' खेळू शकला असता, असे म्हटले गेले होते. मदनलालने "ऑफ स्टंप'वर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, मात्र रिचर्डसच्या अंदाजापेक्षाही चेंडू हळू आला आणि प्रत्यक्षात रिचर्डसचा "शॉट'
आधीच बसला. मिडविकेटला तेव्हा कुणी नव्हते. कपिल मिडॉनला तर यशपाल शर्मा "फाईनलेग'ला होता. यशपालसुद्धा धावत होता. चेंडू बराच उंच गेल्यामुळे कपिलने प्रसंगावधान राखून यशपालला इशारा केला. याविषयी कपिल म्हणतो की, "तेव्हा मी यशपालला हातवारे करून थांबण्यास सांगितले. रिचर्डस फटका मारताच मी "रिऍक्ट"' झालो होतो. त्यामुळे "रिफ्लेक्सा'ला महत्त्व होते.' हे सर्व घडत असताना रिचर्डसला काय वाटत होते? त्याची प्रतिक्रिया अशी होती- "ज्या क्षणी कपिलने दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला थांबण्याची सूचना केली, त्याचवेळी मला कळून चुकले की, आता हा झेल तो सोडणार नाही...' 28 चेंडूंत सात चौकारांसह 33 धावा काढून रिचर्डस बाद झाला.

त्याआधी भारताने गॉर्डन ग्रिनीज आणि नंतर क्लानईव्ह लॉईड हे मोहरे गारद केले; पण रिचर्डसचा "कॅच' हाच "टर्निंग पॉइंट' ठरला, कारण त्यामुळे क्रिकेटमधील सत्तापालट झाला होता!

एखादा चित्रपट खूप वेळा पाहिल्यावर त्यातील प्रत्येक शॉट "फ्रेम टू फ्रेम' मनात कोरला जातो. क्रिकेटप्रेमींचे तसे नसते. एक "ऍक्श न' आणि एक "रिप्ले' पाहिल्यावर ती कधीच स्मृतिपटलावरून पुसली जात नाही. कपिलने घेतलेल्या रिचर्डसच्या "कॅच'बद्दल हेच म्हणता येईल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Day That year when Kapil Dev takes catch of Viv Richards in World Cup 1983