खेळाडूंना हाताळण्यात धोनी कुशल - कुंबळे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

धोनी अजूनही भारतीय क्रिकेटचा नेता आहे. कर्णधार म्हणून निवृत्त झाला, तरी फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून त्याचा अनुभव नेहमीच संघासाठी एखाद्या नेत्यासारखाच उपयोगी पडणार आहे. 
अनिल कुंबळे, भारतीय संघाचे मार्गदर्शक

पुणे - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी नक्कीच सर्वोत्तम आणि यशस्वी ठरल्याची पावती गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिली. कर्णधार म्हणून खेळाडूंना हाताळण्यात तो कुशल होता, अशा शब्दांत त्यांनी त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला दाद दिली. 

भारतीय संघाच्या दुसऱ्या सत्रादरम्यान कुंबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""धोनीने माझ्याकडूनच नेतृत्वाची धुरा स्वीकारली. त्या वेळी मी थकलो होतो. प्रकृती साथ देत नव्हती. अशा वेळी नेतृत्वाची जबाबदारी धोनीकडे सोपविण्याची योग्य वेळी होती आणि धोनी देखील आव्हान स्वीकारण्यास तयार होता. तीच वेळ आता आली आहे. धोनीने योग्य वेळी नेतृत्वाची जबाबदारी सोडली आणि विराटही आता कर्णधार म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडू लागला आहे.'' 

धोनीच्या कर्णधारपदाच्या दहा वर्षांच्या कालावधीला कुंबळे यांनी सलाम ठोकला. ते म्हणाले, ""2007 ते 2017 दहा वर्षाचा धोनीचा कर्णधार म्हणून कालावधी वैशिष्ट्यपूर्ण होता. त्याने अनेक आव्हानातून एक यशस्वी भारतीय संघ बांधला. टी 20 विजेतेपदाने त्याच्या कर्णधारपदाच्या यशस्वी कारकिर्दीला सुरवात होते. पुढे एकदिवसीय विजेतेपद, कसोटीतील अव्वल मानांकन असे सगळे यश त्याने पचवले.'' 

अनेक वरिष्ठ खेळाडू त्याच्या कालावधीत निवृत्त झाले. त्या परिवर्तनाच्या कालावधीतही त्याने संघ चांगल्या पद्धतीने हाताळला. मुळातच खेळाडूंना मग तो वरिष्ठ असो वा कनिष्ठ त्यांना हाताळण्याचे वेगळेच कसब त्याच्याकडे होते, असे सांगून कुंबळे यांनी या संघातील एक युवी सोडला, तर प्रत्येक खेळाडूने धोनीच्या नेतृत्वाखाली कारकीर्द सुरू केल्याचे आवर्जून सांगितले. 

Web Title: Dhoni ready to handle players - Kumble