International Day of Disabled Persons: पॅरा-बॅडमिंटनमधला सचिन!

मानसिकदृष्ट्या अपंग असूनही खेळाचे मैदान गाजवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या कारकीर्दीचा वेध.
International Day of Disabled Persons
International Day of Disabled Personssakal

प्रशांत केणी, वरिष्ठ क्रीडा पत्रकार

शरीराच्या अपंगत्वात मात करीत यशाचे इमले रचणारे अनेक क्रीडापटू आढळतात. कृत्रिम पायाच्या बळावर पॅरालिम्पिक स्पर्धेत वर्चस्व गाजवणारा दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस असो किंवा भारतामधील अवनी लेखारा अथवा मानसी जोशी अशी अनेक उदाहरणे आढळतात. पण मानसिकदृष्ट्या अपंगत्वावर मात करूनही जगभरात अनेक क्रीडापटूंनी आपले कर्तृत्व गाजवले आहे. भारतातील अशा क्रीडापटूंची ओळख.

sachin sharma
sachin sharmasakal

पॅरा-बॅडमिंटनमधला सचिन!

२०१४मध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या विशेष क्रीडापटूंच्या ऑलिम्पिकमध्ये सचिन शर्माने एकेरी, दुहेरी आणि मिश्र गटांमध्ये सहभाग घेतला आणि एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

सचिनचे कुटुंब हे मूळचे हरयाणातील. सचिनचे वडील सतीश शर्मा हे स्काय लाइन ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरव्हायजर होते. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आवडायचा, म्हणून त्याची आई उषादेवीने आपल्या मुलाचे नावही सचिन ठेवले. पण सचिनच्या बालपणीच तिने जगाचा निरोप घेतला. मुलाचे यश पाहायला ती नव्हती.

पण वडिलांनी पुण्यात स्थलांतर करत हिंमतीने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. यापैकी सचिनचा सांभाळ करणे, हे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक होते.

चिंचवडच्या संभाजीनगर परिसरातील साई संस्कार या मानसिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांच्या शाळेत सचिनचे शालेय शिक्षण सुरू झाले. याच काळात सचिनला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. याचे श्रेय जाते ते त्याच्या वडिलांना.

sachin sharma with coach nikhil kanitkar
sachin sharma with coach nikhil kanitkarsakal

सराव आणि व्यायाम या दोन्हीतून त्याला उसंत मिळत नसे आणि त्याच्या वडिलांनाही. या वाटचालीत सचिनच्या पोटाच्या शस्त्रक्रियेचे आव्हान उभे ठाकले. पण डॉक्टरांनी त्याला तीन महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला. दोनच महिन्यांत यातून सावरत सचिन चेन्नईला राष्ट्रीय क्रीडा शिबिरात सहभागी झाला. इतकेच नव्हे, तर विशेष ऑलिम्पिकसाठी त्याची निवडही झाली.

‘‘सचिन जेव्हा स्पर्धेसाठी तयारी करीत होता, तेव्हा त्याचं जिंकणं कठीण असल्याचं प्रत्येकाचं म्हणणं होतं. परंतु मी आणि सचिनने विजयाचे स्वप्न पाहिले होते. ते सत्यात उतरले. पुण्याचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक निखिल कानिटकर यांचे मार्गदर्शनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरले,’’ असे सतीश शर्मा यांनी सांगितले.

निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीमध्ये अपंगांप्रमाणे सक्षम खेळाडूंनाचालवतात. अपंगांप्रमाणेच विशेष क्रीडापटूंनीही त्यांचे मार्गदर्शन घेऊन यश मिळवले आहे.

यासंदर्भात सचिनबाबत कानिटकर म्हणाले, ‘‘२०१४मध्ये मानसिकदृष्ट्या विकलांग सचिन हा हरयाणाहून माझ्याकडे प्रशिक्षणासाठी आला. सचिनला शिकवायचे कसे, हे आव्हान अवघड होते. त्यात भाषा ही अडचण होती. पण त्याला बॅडमिंटन खेळायची विलक्षण आवड होती. त्यामुळे ते कठीण गेले नाही आणि सचिनने सुवर्णयश मिळवले.’’

International Day of Disabled Persons
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

‘विपुल’ गुणवत्ता!

विपुल जैन हा जन्मत:च विशेष बालक. पण त्याच्या वडिलांना आपल्या मुलाने काहीतरी करून दाखवावे, असे वाटायचे. लॉस एंजेलिस विशेष ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारताच्या सॉफ्टबॉल संघात विपुलचा समावेश होता. त्याचा भाऊ हार्दिक म्हणाला, ‘‘विपला फाऊंडेशनच्या सेव्ह दी चिल्ड्रन इंडिया विशेष शाळेत विपुल शिकायचा. त्याच्या शिक्षणासाठी आणि खेळासाठी वडिलांनी अतिशय मेहनत घेतली. त्यांचे कुर्ल्याच्या बैलबाजारात दुकान होते. विपुलने विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवली. त्यानंतर त्याचा बऱ्याच ठिकाणी सत्कार झाला. त्याच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे आम्हा संपूर्ण कुटुंबाला अप्रूप वाटायचे.’

सेव्ह दी चिल्ड्रन इंडिया शाळेतील शारीरिक शिक्षणाचे शिक्षण सुभाष गढारी यांनी विपुलमधील गुणवत्ता हेरली. तो खेळाकडे कसा वळला, याबाबत ते म्हणाले, ‘विपुल हा खेळात अष्टपैलू होता. क्रिकेट, धावणे अशा अनेक स्पर्धांमध्ये तो हिररीने भाग घ्यायचा. त्याच्या पालकांचेही पाठबळ महत्त्वाचे होते. ते त्याला सरावासाठी किंवा स्पर्धेसाठी वेळेत घेऊन यायचे. नंतर क्रिकेटप्रमाणेच असलेल्या सॉफ्टबॉलच्या कौशल्याला आम्ही प्रोत्साहन दिले. तो १५ वर्षांचा असताना निवड चाचणीला गेला, तेव्हा त्याचे वय आणि उंची लहान असल्यामुळे काही जणांनी आक्षेप घेतला. पण त्याचा खेळ पाहिल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले.’

International Day of Disabled Persons
दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

मानसिक अपंगत्त्व म्हणजे नेमकं काय?

‘मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींचे माइल्ड (सौम्य), मॉडरेट (मध्यम), सिव्हिअर (तीव्र) आणि प्रोफाऊंड (गंभीर) अशा चार प्रकारांत वर्गीकरण होते. ८५ टक्के मानसिक विकलांग व्यक्ती हे माइल्ड प्रकारातील असतात. त्यांचा बुद्ध्यांक ५० ते ७५पर्यंत असतो. या प्रकारच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता ही सर्वसाधारणपणे पाचवी ते सातवीपर्यंतच्या इयत्तेमधील मुलांइतकीच विकसित झालेली असते. याच गटातील मुलांना शाळेचा अभ्यास पुढे जाऊन झेपत नाही. परंतु अन्य जीवनावश्यक गोष्टी म्हणजे पैसे, काही सोपी कामे त्यांना समजतात आणि करता येतात. हे व्यक्ती खेळात उत्तम प्रावीण्य मिळवू शकतात. परंतु यासाठी उत्तम वैयक्तिक प्रशिक्षण आणि प्रेरणादायी वातावरणाची नितांत आवश्यकता असते,’’ असे मानसतज्ज्ञ डॉ. नीता ताटके यांनी सांगितले.

‘‘मॉडरेट प्रकारात १० टक्के व्यक्तींचा समावेश असतो. त्यांचा बुद्ध्यांक ३५ ते ५५पर्यंत असतो सिव्हिअर आणि प्रोफाऊंड प्रकारात काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता असते. सिव्हिअर प्रकारात काही व्यक्तींना मानसिकतेसह शारीरिक विकलांगतासुद्धा काही प्रमाणात असते. प्रोफाऊंड प्रकारात व्यक्तीची बाळाप्रमाणे काळजी घ्यावी लागते,’’ असे ताटके यांनी पुढे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com