राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत "डोपिंग'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

"नाडा' पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकार उघड
पुणे - क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवनाचा विळखा काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचे लोण आता कुमार खेळाडूंपर्यंत पोचले आहे. येथे सुरू असलेल्या 62व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेदरम्यान खेळाडूंकडून उत्तेजकांचे सेवन झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

"नाडा' पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकार उघड
पुणे - क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवनाचा विळखा काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचे लोण आता कुमार खेळाडूंपर्यंत पोचले आहे. येथे सुरू असलेल्या 62व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेदरम्यान खेळाडूंकडून उत्तेजकांचे सेवन झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

स्पर्धेतील "थ्रो' प्रकाराच्या स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी खेळाडूंनी उत्तेजक घेतल्याचे पुरावे सापडले आहेत. मुख्य स्टेडियमच्या मागे असलेल्या सराव मैदानावर "थ्रो' प्रकारातील स्पर्धा होत आहेत. या मैदानाच्या सभोवाताली असलेल्या मोकळ्या जागेत इंजेक्‍शन घेऊन फेकून दिलेल्या सिरींज आढळल्या आहेत. त्याचबरोबर "रेड बुल' या एनर्जी ड्रिंकचे टिनही मोठ्या प्रमाणात आढळले. अर्थात, बंदी घातलेल्या पेयांच्या यादीत "रेड बुल'चा समावेश आहे की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, खेळाडू सर्रास इंजेक्‍शन घेताना दिसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

खेळाडू इंजेक्‍शन घेत असल्याचे आढळल्यावर काही अधिकारी तेथे धावले, तेव्हा त्यांनी वापरलेल्या सिरींज तशाच फेकून पळ काढला. त्याचबरोबर एका मुलीच्या किटमध्येही सिरींज आणि औषधे आढळली. त्या वेळी संबधित मुलीने किट घेऊन पळ काढला.

या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या बाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ""आमच्यापर्यंत याबाबत काही माहिती आलेली नाही. मात्र, आम्ही या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करू. शालेय स्पर्धातच असे प्रकार होत असल्याने उत्तेजकांपासून खेळाडूंना रोखण्याचे मोठे आव्हान समोर आले आहे. आम्ही ही माहिती शालेय क्रीडा महासंघाकडे पाठवू. यात त्यांचीच सर्वाधिक जबाबदारी आहे.''

स्पर्धेदरम्यान निरीक्षक असलेल्या कन्हैया गुर्जर यांचीही प्रतिनिधीने गाठ घेतली. ते म्हणाले, ""उत्तेजक सेवन आता सर्रास होऊ लागले आहे. ते रोखण्याचे आव्हान आहे. आम्ही उपाययोजना करत असून, या स्पर्धेत खेळाडूंच्या उत्तेजक चाचणी घेण्यात आल्या आहेत. चाचणीत दोषी आढळलेल्या खेळाडूंवर कडक कारवाई करू. "नाडा'चे अधिकारी येथे आहेत. ज्या खेळाडूंनी उत्तेजकाचे सेवन केले असेल, ते निश्‍चित यात अडकतील.'' या स्पर्धेदरम्यान दुसऱ्या दिवसापर्यंत बारा क्रीडा प्रकारांत चाचणी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यात प्रामुख्याने "थ्रो' प्रकारातील आणि शंभर मीटर, तसेच उडी या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

त्यांना प्रमाणपत्र नाहीत
या स्पर्धेत एकूण 1322 स्पर्धकांचा सहभाग होता. यातील 79 खेळाडू येथे आलेलेच नाहीत. मात्र, दहा खेळाडू येऊनही सहभागी झालेले नाहीत. या 89 खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, अशी माहिती स्पर्धेचे निरीक्षक कन्हैया गुर्जर यांनी दिली.

Web Title: doping in National school athletic competition