
ENGvsNZ : टीम इंडिया विरुद्धच्या लढतीपूर्वी किवींना धक्का
ENG vs NZ 2nd Test : टीम इंडिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला असून त्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतलीये. 10 जून पासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात य़ेणार आहे. एजबेस्टनच्या मैदानात रंगणाऱ्या या सामन्यात टॉम लॅथम न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. केन विल्यमसनच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली असून टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या मेगा फायनलमध्ये तो खेळणार का? याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याची दुखापत गंभीर असेल तर न्यूझीलंडला मोठा फटका बसू शकतो. इंग्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. या सामन्याची खबरदारी म्हणूनच केन विल्यमसनशिवाय दुसरा कसोटी सामना खेळण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने घेतल्याचे दिसते.
हेही वाचा: ICC Test Rankings: जड्डूसह साउदीला चांगल्या कामगिरीच बक्षीस!
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आला होता. तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसाने वाया घालवल्यानंतर हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या कसोटी सामन्यात विल्यमसनला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. त्याच्याशिवाय मिचेल सँटनरही दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याला देखील कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहेच.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझींलडकून पदार्पण करणाऱ्या डेवोन कॉन्वेनं दमदार पदार्पण केले होते. द्विशतकी खेळी करणाऱ्या कॉन्वेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच्याकडून दुसऱ्या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्याशिवाय टीम साउदीकडे गोलंदाजीची प्रमुख धूरा असेल. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साउदीने 7 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात त्याला कायले जेमिनसनने उत्तम साथ दिली होती. टीम इंडियाविरुद्दच्या सामन्यापूर्वी ही जोडी पुन्हा गोलंदाजीतील ताकद दाखवून देण्यास उत्सुक असेल. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम नेतृत्वाची धूरा कशी पेलणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
Web Title: Eng Vs Nz Kane Williamson Ruled Out Of The Second Test Against England Tom Latham Will Lead New
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..