World Cup 2019 : इंग्लंडच्या 337 धावा; भारताची परीक्षा

World Cup 2019 : इंग्लंडच्या 337 धावा; भारताची परीक्षा

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : क्रिकेट अजब खेळ का म्हणला जातो याचे कारण बर्मिंगहमच्या एजबास्टन मैदानावरील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात बघायला मिळाले. गेल्या काही सामन्यात खराब खेळ करून तोल गेलेल्या यजमान इंग्लंड संघाकरता भारतासमोरच्या मोलाच्या सामन्यात सगळ्या गोष्टी जमून आल्या. कप्तान इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोच्या  सलामीच्या जोडीने दणदणीत सुरुवात करून दिल्यावर इंग्लंड संघाला गेलेला तोल सावरायला वेळ लागला नाही. बेन स्टोकस् 79 धावा आणि  जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकाच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337  धावफलक उभारून मोठे आव्हान भारतासमोर उभे केले. महंमद शमीने सलग तिसर्‍या सामन्यात प्रभावी मारा करून 5 फलंदाजांना बाद केले.

एजबास्टन मैदानावर नाणेफेकीचा कौल इयॉन मॉर्गनच्या बाजूने लागला तेव्हा नशिबाची साथ इंग्लंड संघाला मिळू लागली. सुरुवातीच्या काही षटकात जेसन रॉय आणि बेअरस्टोला महंमद शमीने खूप वेळश चकवले आणि फलंदाज बाद होताना वाचले. चार चेंडू तटवून खेळल्यावर दोन चेंडूंवर चौकार किंवा षटकार मारले जायला लागले. जम बसल्यावर रॉय- बेअरस्टो जोडीने जबरदस्त ताकदीने फटके मारले. एजबास्टन मैदानाच्या सीमारेषा त्यांच्याकरता छोट्या पडू लागल्या. हवेतून मारलेले फटके झेल म्हणून खेळाडूंनी नव्हे तर प्रेक्षकांनी पकडले.  10 षटकात 47 धावांवरून पुढील 5 षटकात भागीदारीचे शतक फलकावर लागले असे तुफान आक्रमण दोघा फलंदाजांनी केले. 


बेअरस्टोचे अर्धशतक पहिल्यांदा पूर्ण झाले. फिरकी गोलंदाजांना दोघांनी रिव्हर्स स्वीपचा मुक्तहस्ते प्रभावी वापर केला. तसेच हवेतून फटके मारताना सहजता दाखवली. आक्रमण इतके तगडे होते की 10 ते 20 षटकांच्या काळात षटकामागे 10 धावांची सरासरी सहजी राखली गेली. कुलदीप यादवच्या गुगलीने जेसन रॉयला चकवले. त्याने हवात मारलेला फटका रवींद्र जडेजाने सूर मारत जमिनीपासून काही इंचावर पकडला आणि जेसन रॉय 66 धावा करून बाद झाला.

जॉनी बेअरस्टोने टीकाकारांना सडेतोड उत्तर देताना उभारलेली शतकी खेळी लक्षणीय ठरली. अवघ्या 90 चेंडूत बेअरस्टोने 8 चौकार आणि 6 षटकारांसह शतक झळकावले. शतकानंतर अजून मोठे आघात करायच्या विचारात असलेल्या बेअरस्टोला महंमद शमीने बाद केले. कप्तान इयॉन मॉर्गनला आखूड टप्प्याच्या चेंडू टाकून जाळ्यात पकडण्याची योजना शमीने यशस्वी करून दाखवली. मॉर्गन एका धावेवर तंबूत परतला. अचानक सामन्याची लय बदलली धावगतीला थोडे ब्रेक लागले. 28 ते 37 षटकांदरम्यान एकही चौकार भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना मारून दिला नाही. 30 ते 40 च्या खेळात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करून दोन फलंदाजांना बाद केले आणि फक्त 43 धावा दिल्या.  

हाती असलेल्या धावा पुरेशा नाहीत हे जाणून बेन स्टोकस्ने शेवटच्या 10 षटकात आक्रमण चालू केले. कुलदीप - चहलच्या 20 षटकात 160 धावा काढल्या गेल्या. हार्दिक पंड्याचे कौतुक करावेच लागेल कारण फलंदाज सुसाट आक्रमण करत असताना पंड्याने 10 षटकात फक्त 60 धावाच दिल्या. स्टोकस् - रुटची रंगलेली भागीदारी तोडायला परत एकदा महंमद शमी कामी आला. स्टोकस्ने धावगतीला वेग देणारी 53 चेंडूतील 79 धावांची खेळी केली. शेवटच्या 5 षटकात 48 धावांची बरसात करण्यात यश आल्याने इंग्लंडला 7 बाद 337 धावांचे आव्हान उभारता आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com