esakal | WTC साठी न्यूझीलंडचा प्लॅन, मुंबईत जन्मलेल्या खेळाडूला संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Ajaz Patel

WTC साठी न्यूझीलंडचा प्लॅन, मुंबईत जन्मलेल्या खेळाडूला संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (WTC Final) पुर्वी न्यूझीलंडने भारतीय वंशाच्या गड्याला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना बर्मिंघहॅमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघात मोठा बदल करण्यात आलाय. पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या टीम साउदी आणि कायले जेमीनसन यांना विश्रांती दिली असून पहिल्या सामन्यातील विश्रांतीनंतर ट्रेंड बोल्डला संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबतच डावखुरा स्पिनर आणि भारतीय वंशज अजाझ पटेल (Ajaz Patel) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

अजाझ पटेल याचा जन्म मुंबईचा. 21 ऑक्टोबर 1988 मध्ये भारतात जन्मलेल्या अजाझ 8 वर्षांचा असताना त्याचे कुटुंबिय न्यूझीलंडला स्थलांतरित झाले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला संधी देत न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याला खेळवण्याचे संकेत दिले आहेत. आपल्याच देशाविरुद्ध तो मेगा फायनलमध्ये खेळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?

टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात खेळणे कठीण असेल, अशी प्रतिक्रिया यापूर्वीच अजाझ पटेलने दिली होती. यासंदर्भातील अजाझ पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या देशात तुमचा जन्म झाला त्या देशाच्या विरुद्ध खेळणे खूप कठीण आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान मिळाले तर तो अविस्मरणीय प्रसंग असेल, असे अजाझने म्हटले आहे.

अजाझ पटेलने 2018 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तान विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला होता.

हेही वाचा: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी, दिग्गजाला डच्चू?

अजाझ पटेल याने 8 कसोटी सामन्यात 22 विकेट मिळवल्या आहेत. इंग्लंड आणि टीम इंडिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी न्यूझीलंडने त्याला संघात स्थान दिले होते. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र आता टीम इंडिया विरुद्धच्या मेगा फायनलपूर्वी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया विरुद्ध संघात खेळवण्याचे संकेतच न्यूझीलंडने दिले आहेत.