Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचे स्वप्नभंग; फ्रान्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये 5-3 फरकाने विजय

स्लोव्हेनियाविरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला पोर्तुगीज गोलरक्षक दिओगो कॉस्ता यावेळी फटके अडवू शकला नाही.
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldoesakal
Summary

दोन वर्षांपूर्वी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटवर नमविले होते, त्या स्मृतींना तिलांजली देत फ्रेंच संघ युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला.

हॅम्बर्ग ­­: यावेळची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा (Euro Cup Football Tournament) ३९ वर्षीय पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी (Cristiano Ronaldo) अखेरची मानली जाते, त्या पार्श्वभूमीवर निरोपाच्या स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंगले. दोन वेळच्या माजी विजेत्या फ्रान्सने अटीतटीच्या लढतीत निर्धारित व अतिरिक्त वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पोर्तुगालला ५-३ असे नमविले.

उपांत्य फेरीत आता फ्रान्ससमोर (France) स्पेनचे आव्हान असेल. अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत स्पेनने यजमान जर्मनीला अतिरिक्त वेळेत २-१ फरकाने हरविले. काही दिवसांपूर्वी राऊंड ऑफ १६ फेरीत पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियास हरविले होते; परंतु उपांत्यपूर्व लढतीत त्यांना फ्रान्सविरुद्ध त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. स्लोव्हेनियाविरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला पोर्तुगीज गोलरक्षक दिओगो कॉस्ता यावेळी फटके अडवू शकला नाही.

दोन वर्षांपूर्वी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटवर नमविले होते, त्या स्मृतींना तिलांजली देत फ्रेंच संघ युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये पोर्तुगालचा बदली खेळाडू जुआव फेलिक्स याचा नेम चुकला, त्यानंतर थिओ हर्नांडेझने अचूक नेम साधत फ्रेंच संघाच्या उपांत्य फेरीतील जागेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर कर्णधार किलियन एम्बाप्पेसह साऱ्या खेळाडूंनी चाहत्यांच्या पाठबळावर एकच जल्लोष केला.

Cristiano Ronaldo
HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे 7 रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

तीन वर्षांपूर्वी राऊंड ऑफ १६ फेरीत गारद झालेल्या फ्रान्सने यावेळी आगेकूच राखली. पेनल्टी शूटआऊटमध्ये उस्मान डेम्बेले याने फ्रान्ससाठी अचूक नेमबाजी केल्यानंतर, पोर्तुगालच्या पहिल्या किकवेळी रोनाल्डोने योग्य दिशेने नेम साधला. तिसऱ्या किकच्या वेळेस फेलिक्स गडबडला आणि पोर्तुगालचे नुकसान झाले.

सर्वाधिक ३० सामन्यांचा मानकरी

रोनाल्डो संघात असताना पोर्तुगालने २०१६ साली युरो करंडक पटकावला होता, यंदा आणखी एका करंडकासह निरोप घेण्यासाठी तो इच्छुक होता. सहाव्यांदा युरो करंडक खेळणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा स्पर्धेतील हा एकंदरीत ३० वा सामना ठरला. असा पराक्रम साधणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. त्याने स्पर्धेत एकूण १४ गोल नोंदविले आहेत; पण यंदा एकही गोल नोंदवू शकला नाही. स्लोव्हेनियाविरुद्ध पेनल्टी फटक्यावर गोल करण्यास रोनाल्डोला अपयश आले होते.

हा अतिशय चुरशीचा, अटीतटीचा सामना होता, कोणत्याही बाजूने झुकला असता. थकवाही आला होता. बारीक तपशिलांवर निर्णय होतो, तरीही मी संघासाठी आनंदी आहे. त्यांनी मर्यादेपर्यंत प्रयत्न केले आणि त्यास योग्य बाजूने झुकविले. आम्ही आता उपांत्य फेरीत दाखल झालेलो असलो तरी आम्हाला गृहीत धरू नये.

-दिदिए देशॉ, फ्रान्सचे प्रशिक्षक

आम्ही चांगला खेळ केला आणि कितीतरी संधी निर्माण केल्या. उत्तम वृत्ती प्रदर्शित केल्याबद्दल मला खेळाडूंचा अभिमान वाटत आहे. आम्ही विजयासाठी लायक होतो आणि हा दुःखाचा क्षण आहे, तरीही खेळाडूंना स्वतःबद्दल अभिमान वाटायला हवा. आम्ही अभिमानाने हरलो आहोत. खऱ्या पोर्तुगीज शैलीत आम्ही सर्वकाही दिले. आम्ही इथेच थांबणार नाही, भविष्यात मुसंडी मारू.

-रॉबर्टो मार्टिनेझ, पोर्तुगालचे प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com