राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस पुन्हा मुदतवाढ; 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर कालावधीत आयोजन

goa olympics
goa olympics

पणजी : वर्षभरातील कालावधीत गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस आणखी एक मुदतवाढ मिळाली आहे. बहुचर्चित स्पर्धा पुढील वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे ठरले आहे. तयारीअभावी गोव्याने स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकली होती.

नवी दिल्ली येथे भारतीय ऑलिंपिक संघटनेची (आयओए) शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.  गोव्याला स्पर्धेसाठी आणखी एक मुदतवाढ देताना, आयओएने राज्य सरकारला सहा कोटी रुपये प्रायोजिकता रक्कम भरण्यास सांगितले आहे.

बैठकीस आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, गोवा ऑलिंपिक संघटनेचे (जीओए) अध्यक्ष केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, आयओएचे सचिव राजीव मेहता, अन्य पदाधिकारी, जीओएचे सचिव गुरुदत्त भक्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोव्याला मुदतवाढ देण्याचे ठरले. मुदतवाढीसंदर्भात राज्य सरकारने आयओएला विनंती केली होती. यावेळी राज्याचे क्रीडा सचिव अशोक कुमार, तसेच अन्य प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

गोव्याला आणखी एक मुदतवाढ मिळवून देण्यात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे जीओएचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. गेल्या १० ऑगस्टला गोवा ऑलिंपिक संघटनेची आमसभा झाली होती. तेव्हा राष्ट्रीय स्पर्धा गोव्यातच व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका श्रीपाद यांनी घेतली होती. तसा ठरावही आमसभेत संमत झाला होता. स्पर्धा झाली नाही, तर तो गोव्यावरील डाग असेल, असे श्रीपाद यांनी नमूद केले होते.

अगोदर यावर्षी ३० मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार होती, पण लोकसभा निवडणूक, तसेच राज्य विधानसभेची पोटनिवडणूक यामुळे राज्य सरकारने त्या कालावधीत स्पर्धा घेण्यास असमर्थतता व्यक्त केली. प्रत्यक्षात साधनसुविधाच तयार नव्हत्या. नंतर आवश्यक तयारीअभावी यावर्षी १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीतही स्पर्धा घेण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले. स्पर्धेसाठी गोवा जानेवारी २०२० नंतर सज्ज होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात गोवा स्पर्धेसाठी पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत तयार असेल, अशी माहिती दिली होती.

ऑलिंपिकनंतर स्पर्धा

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी किंवा नंतर लगेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास आयओए तयार नव्हते. अखेरीस श्रीपाद यांची मध्यस्थी यशस्वी ठरून गोव्यात पुढील वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा घेण्यास आयओए राजी झाले, असे भक्ता यांनी नवी दिल्ली येथून सांगितले. वर्षभराच्या कालावधीत गोव्याला जय्यत तयारी करण्याची संधी आणि वेळ मिळत आहे, असेही भक्ता यांनी स्पष्ट केले.  अगोदर ठरल्यानुसार, गोव्यातील स्पर्धेत ३५ खेळांचे ३७ क्रीडा प्रकार असतील. नेमबाजी व सायकलिंग स्पर्धा गोव्याबाहेर होईल. या खेळाडूंच्या सुविधा तयार करण्यास गोव्याने असमर्थतता व्यक्त केली आहे. स्पर्धेची क्रीडा नगरी नसेल, तर क्रीडापटूंना स्पर्धा केंद्रांच्या परिसरात हॉटेलमध्ये निवासाची सोय असेल.

मुदतवाढीची स्पर्धा

-  गोवा सरकार आणि आयओए यांच्यात २००८ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन (होस्ट सिटी) करार

- गोव्यात २०११ साली स्पर्धा घेण्याचे नियोजन

-  केरळमधील ३५वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबून २०१५ मध्ये झाली

- गोव्यातील स्पर्धा २०१६ पर्यंत लांबणीवर

- २०१७ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या कारणास्तव त्या वर्षी स्पर्धा घेण्यास गोव्याचा नकार

-  ४ ते १७ नोव्हेंबर २०१८ कालावधीत स्पर्धा घेण्याचे निश्चित, पण गोव्याची साधनसुविधा तयारीबाबत प्रगती असमाधानकारक व स्पर्धा लांबणीवर

- ३० मार्च ते १४ एप्रिल २०१९ हा स्पर्धेचा नवा कालावधीत, पण गोव्याची तयारी अपूर्ण, पण लोकसभा आणि राज्य विधानसभा पोटनिवडणुकीचे कारण

- स्पर्धा लांबविल्याबद्दल गोव्याला १० कोटी रुपयांचा आयओएकडून दंड, जूनमध्ये दंड माफ, मात्र सहा कोटी रुपये अतिरिक्त आयोजन शुल्क भरण्याचे आयओएकडून पत्र

- १ ते १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत स्पर्धा घेण्यास गोवा राजी, आयओएकडून मुदतवाढ, पण जुलैमध्ये राज्य सरकारचा स्पर्धा घेण्यास नकार व नव्या तारखांची मागणी

- स्पर्धा गोव्याबाहेर नेण्याचा आयओएच्या इशारा, त्यानंतर केंद्र पातळीवर गोव्याचे जोरदार प्रयत्न

-  ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गोव्याला आणखी एक मुदतवाढ आणि २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२० हा कालावधीत निश्चित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com