
T-20 : "भविष्यात मोजक्याच टी-२० लीग टिकतील"
ट्वेन्टी-२० लीगच्या प्रसारामुळे जगभरात क्रिकेटसाठी निश्चितच नवा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे, परंतु भविष्यात किती लीग अस्तित्व टिकवून रहातील याचे भवितव्य मार्केटमध्ये असलेल्या मागणीवर अवलंबून असेल, असे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाही जॉफ आलार्डिस यांनी व्यक्त केले.
व्यावसायिक ट्वेन्टी-२० लीगमुळे क्रिकेट विश्वात खेळाडूंना चांगला निधी मिळू लागला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या झटपट प्रकासाठी चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू पढे येत आहेत. पण अधिक प्रमाणात या लीग झाल्यातर त्या त्यांनाच मारकही ठरू शकतील, असे आलार्डिस यांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात दुबईत आंतरराष्ट्रीय टी-२०, दक्षिण आफ्रिकेत एसए टी-२० लीग, बांगलादेशमध्ये बीपीएल एकाच वेळी झाल्या तर आता पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग सुरू झाली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या या लीगमुळे क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली आहे. परिणामी पारंपरिक फॉरमॅट आणि टी-२० लीग यांचा समतोल बिघडत चालला आहे, असे अलार्डिस यांनी सांगितले. ते दिल्लीत सुरू असलेल्या ग्लोबल बिझनेस परिषद २०२३ साठी आले आहेत.
काही लीग फारच यशस्वी झालेल्या आहेत. बीसीसीआयची आयपीएल तर तर सर्वांसाठी आदर्श लीग आहे. इतरही काही लीग प्रभाव पाडत आहे, असे अलार्डिस म्हणाले.
व्यावसायिक लीगची भूरळ पडत असताना दुसरीकडे नवोदित खेळाडूंचा देशाकडून खेळण्यापेक्षा टी-२० लीगला प्राधान्य देत आहेत, असा सर्व्हे एफआयसीए या खेळाडूंच्या जागतिक संघटनेने केला आहे. भविष्यासाठी हे फार धोकादायक असल्याचे अलार्डिस यांनी सांगितले.