माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मारियानो शनिवारी गडहिंग्लजमध्ये

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मारियानो शनिवारी गडहिंग्लजमध्ये

गडहिंग्लज - येथे गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारी (ता. २९) सकाळी अकरा वाजता ‘फुटबॉल भूषण’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाहू सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मारियानो डायस (गोवा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या वेळी राजस्थानचे रॉबिन झेवियर, पुसद जिल्हा यवतमाळ चेतना क्रीडा मंडळ आणि उदयोन्मुख खेळाडू कुणाल चव्हाण यांचा गौरव केला जाणार आहे.

डायस यांनी फुटबॉलपटू म्हणून गोव्याच्या नामांकित एमआरएफ, साळगांवकर आणि चर्चिल ब्रदर्स या संघाकडून मैदान गाजवले आहे. संतोष टॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ते गोवा संघातून खेळले. भारतीय २३ वर्षांखालील संघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले. प्रशिक्षक म्हणून चर्चिल ब्रदर्स संघाला आय लीग आणि फेडरेशन कप या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले. भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते फिफाचे कोच एज्युकेटर म्हणून काम करत असून एएफसी प्रो लायसनधारक प्रशिक्षक आहेत. जर्मनी, इंग्लंड या ठिकाणी त्यांनी फुटबॉल प्रशिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी युनायटेडतर्फे फुटबॉल भूषण, जीवनगौरव आणि उदयोन्मुख पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. डायस यांच्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्ष स्वाती कोरी, केएसएचे फुटबॉल सचिव प्रा. अमर सासणे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

याच कार्यक्रमात पंजाब येथे झालेल्या संतोष टॉफी स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या सौरभ सुनील पाटील आणि १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या प्रशांत भैरू सलवादे याचाही गौरव होईल. या कार्यक्रमास फुटबॉल शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष संभाजी शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर यांनी केले आहे.

युनायटेड ॲवॉर्डस नाईट
वर्षभरात युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंनी विविध स्पर्धात घवघवीत यश मिळविले. डेरवन, एसजीएम चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. यूथ आय लीग  राष्ट्रीय स्पर्धेत आठ खेळाडू खेळले. या सर्वांचा गौरव शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी साडेसात वाजता शाहू सभागृहात ‘युनायटेड ॲवॉर्डस नाईट’ या कार्यक्रमात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com