स्पेनने 7 गोल करून इतिहास रचला; स्पॅनिश अर्माडासमोर कोस्टारिका ठरली 'गल्ली'तील टीम | FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spain Defeat Costa Rica Register 7 Goals First Time  In World Cup

FIFA World Cup 2022 : स्पेनने 7 गोल करून इतिहास रचला; स्पॅनिश अर्माडासमोर कोस्टारिका ठरली 'गल्ली'तील टीम

Spain Defeat Costa Rica Register 7 Goals First Time In World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये आज ग्रुप E मधील स्पेन आणि कोस्टारिका यांच्यात सामना झाला. हा सामना स्पेनने 7 - 0 अशा मोठ्या गोलफरकाने जिंकत वर्ल्डकपची धडाकेबाज आणि लौकिकास साजेशी सुरूवात केली. स्पेनने पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध 7 गोल केले. आपल्या पासेस आणि बॉल ताब्यात ठेवण्याच्या रणनितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्पेनने आजच्या सामन्यात 1000 च्या आसपास पासेस देत 80 टक्क्यापेक्षा जास्त काळ बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवला. यामुळे स्पेनवर चढाई करण्याची कोस्टारिकाला एकही संधी मिळाली नाही. स्पेनकडून टोरेसने दोन तर ओल्मो, असेन्सो, गाव्ही, मोराटा, सोलेर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला जपानने दिला पराभवाचा धक्का

First Half : स्पेनने कोस्टारिकाला नुसते पळवले

स्पेनचा संघ हा पारंपरिकरित्या पासिंग गेम करण्यासाठीच ओळखळा जातो. बॉल जर प्रतिस्पर्ध्याकडे जाऊ दिलाच नाही तर बचाव करण्याची वेळच येत नाही. याच तत्वाने आज देखील स्पेनने आपल्या पहिल्याच सामन्यात कोस्टारिकाला पहिल्या हाफपासूनच दमवले. स्पेनने बॉलवर ताबा मिळवत आपला पहिला गोल 11 व्या मिनिटालाच केला. स्पेनच्या दानी ओल्मोने गोल करत संघाचे खाते उघडून दिले. त्यानंतर बरोबर 10 मिनिटांनी मार्को असेन्सोने 21 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पहिल्या 25 मिनिटातच दोन गोल खाल्यानंतर कोस्टारिकाचा संघ बॅकफूटवर गेला होता. दरम्यान, कोस्टारिकाच्या ढिसाळ खेळामुळे स्पेनला पेनाल्टी मिळाली. फेरान टोरेसने 31 व्या मिनिटाला मिळालेली पेनाल्टी गोलमध्ये बदलत स्पेनची कोस्टारिकावरील आघाडी पहिल्या हाफमध्ये 3 - 0 अशी नेली.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : पॉर्न स्टारने कतारमध्ये जाणाऱ्या इंग्लंडच्या फॅन्सना दिला सल्ला, म्हणाली...

Second Half : स्पेनचा दबदबा, कोस्टारिकाचे लोटांगण

पहिल्याच हाफमध्ये स्पेनने 3 - 0 अशी मोठी आघाडी घेतल्यानंतर देखील दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी बॉलवरील ताबा आपल्याकडून जाऊ दिला नाही. सामन्याच्या 54 व्या मिनिटालाच टोरेसने पुन्हा एकदा कोस्टारिकाचा बचाव भेदत आपला दुसरा आणि संघाचा चौथा गोल कोस्टारिकाच्या गोलपोस्टमध्ये डागला. यानंतर काही काळ कोस्टारिकाला स्पॅनिश खेळाडूंना आपल्या गोलपोस्टपासून दूर ठेवण्यात यश मिळाले. मात्र गाव्हीने 74 व्या मिनिटाला कोस्टारिकाच्या गोलपोस्टचा वेध घेतला अन् संघाचा पाचवा गोल साकारला. पासेस आणि बॉल पजेशनच्या बाबतीत बाप असलेल्या स्पेनने कोस्टारिकाला आपल्या गोलपोस्टच्या आसपास देखील फिरू दिले नाही. दरम्यान, सामना 5 - 0 असा संपेल असे वाटत असतानाच स्पेनच्या कर्लोस सोलेरने शेवटच्या मिनिटाला सहावा गोल डागत गोलची संख्या अर्धा डझनवर नेली. एक्स्ट्रा टाईममध्ये अल्वारो मोराटाने सातवा गोल करत कोस्टारिकावरील स्पेनचा विजय अजून मोठा केला.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का