FIFA World Cup : विश्वकरंडकासाठी अर्जेंटिनाचा संघ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup Squad Argentina announce

FIFA World Cup : विश्वकरंडकासाठी अर्जेंटिनाचा संघ जाहीर

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी दोन वेळचे विजेते आणि २०१४ चे उपविजेत्या अर्जेंटिनाचा संघ जाहीर करण्यात असून दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीवर संघाची धुरा असणार आहे. मेस्सीच्या आक्रमणाला धार देण्यासाठी पाउलो डीवाला आणि एंजल डी मारिया यांचीसुद्धा संघात निवड करण्यात आली आहे. हे तिघेही अर्जेंटिनाच्या आक्रमक फळीत खेळणार आहेत.

हेही वाचा: IPL 2023 : MI ने पोलार्डला दिली सोडचिठ्ठी, CSK नं जडेजाबाबत काय केलं?

मधल्या फळीत खेळणाऱ्या भरवशाच्या जिओवानी लो सेल्सो याची दुखापतीमुळे राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली नाही. डायबाला आणि दी मारिया या दोघांनाही गेल्या महिन्यात त्यांच्या त्यांच्या क्लबकडून फुटबॉल खेळताना दुखापतीचा सामना करावा लागला होता; मात्र अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कोलोनी यांनी दोघांवरही आपला विश्वास कायम ठेवत त्यांची संघात निवड केली आहे.

संघनिवडीवर प्रतिक्रिया देताना कर्णधार मेस्सी म्हणाला की, "गेल्या काही सामन्यांत आमचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. देशातील किंबहुना जगभरातील चाहत्यांना आमच्या संघाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. आम्ही सलग ३५ सामने जिंकले असून मागच्या वर्षी 'कोपा अमेरिका' स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आम्ही बालढ्य ब्राझीलला पराभूत केल्याने आमच्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे." तर ज्यांची संघात निवड झाली आहे, त्यांना देशासाठी विश्वकरंडक खेळण्याचा अभिमान वाटत असल्याचे स्कोलोनी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Irfan Pathan : तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे! इरफान पठाणनं पाक पंतप्रधानांची लायकी दिली दाखवून

अर्जेंटिनाने आतापर्यंत १९७८ आणि १९८६ मध्ये असा दोन वेळा फुटबॉल विश्वकरंडक जिंकला आहे; तर ११९० आणि २०१४ मध्ये जर्मनीविरुद्ध त्यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा विश्वकरंडकाच्या 'क' गटात समावेश असून पहिला सामना सौदी अरेबियाशी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या क गटात अर्जेंटिनाबरोबरच मेक्सिको आणि पोलंडचासुद्धा समावेश आहे. मेस्सीची ही शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

  • अर्जेंटिनाचा संघ पुढीलप्रमाणे

    • गोलरक्षक : फ्रँको अरमानी, एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली.

    • बचाव फळी : गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, जर्मन पेझेला, ख्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस टॅगलियाफिको, मार्कोस अकुना, जुआन फॉयथ.

    • मधली फळी : लिएंड्रो परेडेस, गुइडो रॉड्रिग्ज, एन्झो फर्नांडीझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्क्विएल पॅलासिओस, अलेजांद्रो गोमेझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर.

    • आक्रमक फळी: पाउलो डीवाला, लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, निकोलस गोन्झाले, जोक्विन कोरिया, लॉटरी मार्टिनेझ, ज्युलियन अस्वारेझ