परदेशी बॅडमिंटन कोचची गळती कायम

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदात मोलाचा वाटा असलेल्या किम जी ह्यून यांनी भारतीय बॅडमिंटन संघाचे मार्गदर्शकपद सोडले आहे. दोन वर्षांत भारताचे मार्गदर्शकपद सोडलेल्या या तिसऱ्या मार्गदर्शक आहेत.

नवी दिल्ली / मुंबई : पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदात मोलाचा वाटा असलेल्या किम जी ह्यून यांनी भारतीय बॅडमिंटन संघाचे मार्गदर्शकपद सोडले आहे. दोन वर्षांत भारताचे मार्गदर्शकपद सोडलेल्या या तिसऱ्या मार्गदर्शक आहेत.

किम जी ह्यून यांचे पती आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी हे पद सोडले असल्याचे सांगितले जात आहे. सिंधूने जागतिक विजेतपद जिंकल्यानंतर काही दिवसांतच किम न्यूझीलंडला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता आपण पद सोडत असल्याचे कळवले आहे. त्यांची या वर्षाच्या सुरुवातीस नियुक्ती झाली होती.

जागतिक स्पर्धेनंतर काही दिवसांतच किम यांचे पती रिची मारर यांना न्यूरो स्ट्रोकचा त्रास झाला. त्यांना पूर्ण बरे होण्यास चार ते सहा महिनेही लागू शकतात, त्यामुळे किम यांनी राजीनामा दिला आहे, असे राष्ट्रीय मुख्य मार्गदर्शक गोपीचंद यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

आपली मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिलेल्या किम या तिसऱ्या मार्गदर्शक आहेत. यापूर्वी पुरुष संघाची जबाबदारी असलेले मुल्यो हांदोयो यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे 2017 मध्ये सांगितले, पण त्यानंतर काही दिवसांतच सिंगापूरचे मार्गदर्शकपद स्वीकारले. मलेशियाचे तॅन किम हेर यांच्याकडे दुहेरीची जबाबदारी टोकियो ऑलिंपिकपर्यंत होती, पण त्यापूर्वी दीड वर्षे त्यांनी पद सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreign badminton coaches continue to leave india