रौप्यपदक जिंकल्यानंतरही अंकुरला भविष्याची चिंता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होईपर्यंत ऑलिंपिकमध्ये डबल ट्रॅप असणार की नाही हे स्पष्ट झाले असेल. या दोन स्पर्धा झाल्यावरच मी ट्रॅप प्रकारावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. 
- अंकुर मित्तल

मुंबई/दिल्ली - बरखास्तीची टांगती तलवार असलेल्या डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकत अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. चौथ्या दिवशी अंकुरप्रमाणेच संग्राम दहिया आणि तेजस्विनी सावंतची अंतिम फेरी भारतास सुखावत होती. 

नवी दिल्लीतील डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर जितू राय आणि हिना सिद्धूने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले असले तरी ती स्पर्धा चाचणी असल्याने याची नोंद स्पर्धेच्या पदक क्रमवारीत होणार नाही. त्यामुळे अंकुरचे रौप्य हेच भारताचे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. पूजा घाटकरने पहिल्या दिवशी दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताचे पहिले पदक जिंकले होते. भारत पदक क्रमवारीत आता चौथा आहे. चीन सहा सुवर्ण आणि चार रौप्यपदकासह अव्वल आहे. 

अभिनव बिंद्राच्या समितीने डबल ट्रॅपऐवजी मिश्र ट्रॅप स्पर्धा सुरू करण्याची सूचना केली आहे, त्यामुळे काही महिन्यांतच डबल ट्रॅप स्पर्धा निरोप घेईल, पण राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत या खेळाची स्पर्धा होईल असे मानले जात आहे. त्यामुळेच अंकुर या दोन स्पर्धांपर्यंत डबल ट्रॅपचा सराव कायम ठेवणार आहे. खरं तर या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत संग्राम दहियाने तिसरा क्रमांक मिळविताना अंकुरला मागे टाकले होते. संग्राम आणि आघाडीवरील स्टीवन स्कॉट यांच्यात एका गुणाचाच फरक होता. अंतिम फेरीत बाद झालेला पहिला स्पर्धक संग्राम ठरला. या परिस्थितीत अंकुरने जेम्स विलेटला चांगली लढत दिली, पण अखेर जेम्सने अंकुरला ७५-७४ असे चकवले. 

जास्त अचूक लक्ष्य साधल्यामुळे तेजस्विनी सावंतने पन्नास मीटर थ्री पोझीशन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली, पण या फेरीतून बाद होणारी ती दुसरी स्पर्धक ठरली. प्राथमिक फेरीत तेजस्वीनी तसेच मेंगयाओ शि यांचे समान ८२ गुण झाले. अचूक लक्ष्यवेधात ३१-२७ वर्चस्व राखत तेजस्विनीने आगेकूच केली, पण अंतिम फेरीत आठ फैरीनंतर तिचे ४०२.४ गुण होते आणि ती स्पर्धेबाहेर गेली. 

आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होईपर्यंत ऑलिंपिकमध्ये डबल ट्रॅप असणार की नाही हे स्पष्ट झाले असेल. या दोन स्पर्धा झाल्यावरच मी ट्रॅप प्रकारावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. 
- अंकुर मित्तल

Web Title: Future care to ankur after winning the silver medal