दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजीस जागतिक संघटनेची मंजुरी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - भारतात प्रथमच होणाऱ्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेस जागतिक संघटनेच्या पथकाने हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते. दरम्यान, उत्तेजक चाचणी न घेताच झालेल्या निवड चाचणीतून या स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात आल्यामुळे अनेक नेमबाज नाराज असल्याचे समजते.

मुंबई - भारतात प्रथमच होणाऱ्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेस जागतिक संघटनेच्या पथकाने हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते. दरम्यान, उत्तेजक चाचणी न घेताच झालेल्या निवड चाचणीतून या स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात आल्यामुळे अनेक नेमबाज नाराज असल्याचे समजते.

नवी दिल्लीतील विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान डॉ. कर्नीसिंग शूटिंग रेंजवर होणार आहे. भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी जागतिक संघटनेचे पथक आज दिल्लीत आले होते. त्यांनी रेंजची पाहणी केली. ते आता आपला अहवाल जागतिक संघटनेस सादर करतील, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव डी. व्ही. सीताराम राव यांनी सांगितले.

जागतिक महासंघाच्या पाहणी पथकाने आमच्याकडे तरी काहीही विचारणा केलेली नाही. ते सुविधांवर समाधानी असतील, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर ही पाहणी औपचारिकच आहे. या रेंजवर अनेक स्पर्धा झाल्या आहेत, याकडेही या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.

नेमबाज नाराज
पुण्यात झालेल्या चाचणीच्या वेळी उत्तेजक चाचणी न झाल्याबद्दल अनेक नेमबाजांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतचा मुद्दा मांडणारे मानवजित सिंग, तसेच गगन नारंग यांना संघाबाहेर ठेवण्यात आल्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागेल, असेही मानले जात आहे.
रिओ ऑलिंपियन जितू रायने ही चाचणी हवी होती, असेच सांगितले. गगन नारंगने महत्त्वाच्या स्पर्धांच्या वेळी ही चाचणी आवश्‍यक असल्याचे सांगितले. तीन वर्षांपूर्वी झालेल्या चाचणीत एक महिला नेमबाज उत्तेजक चाचणीत दोषी ठरली होती. तिच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, याची आठवण अनुभवी नेमबाज करून देत आहेत.

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे अधिकारी या चाचणीच्या वेळेस आले नसल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळीही उत्तेजक चाचणी झाली नव्हती, याकडे काही नेमबाज पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा चाचणीच्या वेळी उत्तेजक चाचणी नियमितपणे होईल, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले असल्याचे वृत्त आहे.

तीन ऑलिंपियन्स संघाबाहेर
मानवजित सिंग संधू, अपूर्वी चंडेला, तसेच आयोनिका पॉल या तीन ऑलिंपियन नेमबाजांना विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. रिओमध्ये तीन प्रकारांत सहभागी झालेल्या गगन नारंगची एकाच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हीना सिद्धू 10 मीटर पिस्तूलमध्येच असेल. स्पोर्टस्‌ पिस्तूलसाठी तिची निवड झाली नाही. 10 मीटर एअर रायफलमध्ये रवी कुमार व दीपक कुमारच्या साथीला सत्येंद्र सिंग असेल; पण या स्पर्धेसाठी गगन नारंग संघात येऊ शकला नाही. महिलांच्या स्पर्धेसाठीही पूजा घाटकर, मेघना सज्जनार, विनीता भारद्वाज असतील.

Web Title: global organisation permission to delhi worldcup shooting