गोल्फपटू आर्यमानची गुणवत्ता क्रमवारीत हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - पुण्याचा केवळ नऊ वर्षांचा गोल्फपटू आर्यमान सिंग याने भारतीय गोल्फ संघटनेच्या पश्‍चिम विभागीय गुणवत्ता क्रमवारीत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळविले.

पुणे - पुण्याचा केवळ नऊ वर्षांचा गोल्फपटू आर्यमान सिंग याने भारतीय गोल्फ संघटनेच्या पश्‍चिम विभागीय गुणवत्ता क्रमवारीत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळविले.

आर्यमानचे वडील रोहित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वयाच्या तिसऱ्या वर्षी गोल्फ खेळायला सुरवात केल्यानंतर तो पाच वर्षांचा असल्यापासून क्‍लब पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊ लागला. जुलै 2013 मध्ये सहा वर्षांचा असताना तो जागतिक ज्युनिअर स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा सर्वांत कमी वयाचा स्पर्धक ठरला.

अमेरिकेतील कॅलावे आणि यूएस किड्‌स या दोन स्पर्धांत त्याने भाग घेतला. कॅलावेमध्ये 50 देशांचे बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात आर्यमान पहिल्या 15 जणांत आला. किड्‌स स्पर्धेत 56 देशांचे 1800 स्पर्धक होते. त्यात तो पहिल्या 20 जणांत आला. 2014 मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत पहिल्या 20 जणांत, तर 2015 मध्ये तो पहिल्या पाच जणांत आला.

आर्यमानने नव्या मोसमात युरोपीय आणि जागतिक ज्युनिअर स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय ठेवले आहे. तो व्हिबग्योर स्कूलचा विद्यार्थी आहे.

दृष्टिक्षेपात कामगिरी
- भारतीय गोल्फ संघटनेच्या पश्‍चिम विभागीय गुणवत्ता क्रमवारीत (ऑर्डर ऑफ मेरीट) 2014, 15 व 16 अशी सलग तीन वर्षे सर्वोत्तम.
- या कालावधीत या विभागांत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत विजेता
- आतापर्यंत 1021 दिवस अपराजित
- गतवर्षी पुणे, मुंबई, बडोदा व अहमदाबाद येथील स्पर्धांत विजेता
- यंदा 11 वर्षांखालील गटासाठी पात्र
- 18 वर्षांखालील मुला-मुलींमध्येही सर्वोत्तम कामगिरी

Web Title: Golf player aryaman in quality rankings