D Gukesh Chess : गुकेशने कार्लसनची भविष्यवाणी चुकीची ठरवली!

विजेतेपद पटकावत सुमार कामगिरी करणार असल्याच्या वक्तव्याला मागे टाकले. भारताच्या डी. गुकेश याने बुद्धिबळ विश्‍वातील महान खेळाडू मॅग्नस कार्लसन याचा अंदाज, भविष्यवाणी चुकीची ठरवली. कार्लसन याने आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा सुरू होण्याआधी स्पर्धेत सहभागी होत असलेल्या आठ खेळाडूंबाबत भविष्यवाणी केली होती.
D Gukesh Chess
D Gukesh Chesssakal

नवी दिल्ली : भारताच्या डी. गुकेश याने बुद्धिबळ विश्‍वातील महान खेळाडू मॅग्नस कार्लसन याचा अंदाज, भविष्यवाणी चुकीची ठरवली. कार्लसन याने आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा सुरू होण्याआधी स्पर्धेत सहभागी होत असलेल्या आठ खेळाडूंबाबत भविष्यवाणी केली होती. त्यामध्ये गुकेश सुमार कामगिरी करील, असा अंदाज त्याच्याकडून वर्तवण्यात आला होता; पण गुकेशने चक्क विजेतेपदाला गवसणी घालत त्याच्या वक्तव्याला लीलया मागे टाकले.

मॅग्नस कार्लसन याने हिकारू नाकामुरा व फॅबियानो कॅरुअना यांना आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाची संधी असेल, अशी भविष्यवाणी केली होती. तसेच इयान नेपोनियात्ची हादेखील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असा अंदाजही त्याने व्यक्त केला होता. आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी व डी. गुकेश या तीनही भारतीयांकडून त्याला मोठ्या अपेक्षा नव्हत्या. गुकेशने मात्र १४ फेऱ्यांमध्ये दमदार कामगिरी करीत कार्लसनचे वक्तव्य चुकीचे ठरवले.

कार्लसनची भविष्यवाणी

  • हिकारू नाकामुरा व फॅबियानो कॅरुअना- दोघांना विजेतेपदाची संधी

  • इयान नेपोनियात्ची- विजेतेपदासाठी दावेदार

  • एलिरेझा फिरॉझा व आर. प्रज्ञानंद- चांगली कामगिरी करण्याची क्षमता

  • डी. गुकेश व विदित गुजराथी- सुमार कामगिरी करतील

  • निजात एबासोव- वाईट कामगिरी करील गुकेशने सिद्ध केले

मॅग्नस कार्लसन याच्याशी प्रसारमाध्यमांकडून संवाद साधण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, भारताचे खेळाडू पहिल्यांदाच आव्हानवीरांची स्पर्धा खेळत होते. त्यामुळे आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी व डी. गुकेश यांच्याकडून मला मोठ्या आशा नव्हत्या. गुकेशचा खेळही न समजणारा आहे. वेगवान बुद्धिबळात तो कमकुवत आहे, पण आव्हानवीरांच्या स्पर्धेत त्याची क्षमता कळून आली. त्याने स्वत:ला सिद्ध केले. या स्पर्धेपूर्वी त्याने मला सल्ला विचारला होता. त्याला मी म्हटले की, माझ्याकडे देण्यासारखा सल्ला नाही, पण एवढे सांगेन की सुरुवातीला वेडा, क्रेझी होऊ नकोस. संधीची वाट बघ. त्यानंतर मग इतर खेळाडू विलक्षण खेळ करण्याचा प्रयत्न करतील. माझ्या सल्ल्याचा त्याला फायदा झाला असेल असे वाटत नाही. कारण तो खूप छान खेळला.

D Gukesh Chess
D Gukesh Chess : गुकेशच्या प्रगतीसाठी आई- वडिलांचा त्याग

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी. गुकेश सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. त्याचे मनापासून अभिनंदन! दबावाखाली छान खेळ केलास. आताचा क्षण आनंदाने साजरा कर.

- विश्‍वनाथन आनंद, माजी विश्‍वविजेता, भारत

आजची संध्याकाळ मजेत गेली. डी. गुकेश विजेता ठरला. त्याचे अभिनंदन! फॅबियानो कॅरुअना व इयान नेपोनियात्ची या दोघांच्या खेळाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दोघांनी सर्वस्व पणाला लावले. दोघांबद्दल कमालीचा आदर आहे.

- व्लॅदिमिर क्रॅमनिक, बुद्धिबळपटू, रशिया

डी. गुकेश याचा चेन्नईतील उकाडा जास्त असणाऱ्या शहरात जन्म झाला, पण आव्हानात्मक स्पर्धा तापली असतानाही त्याने डोके शांत ठेवून खेळ केला. १७ वर्षीय गुकेशसह भारतीय बुद्धिबळाचे भविष्य उज्ज्वल आहे. भारत देशातील सर्व नागरिकांना गुकेशच्या कामगिरीचा अभिमान आहे.

- आनंद महिंद्रा, व्यावसायिक, भारत

आव्हानवीरांची स्पर्धा जिंकल्याबद्दल डी. गुकेशचे अभिनंदन! पहिल्या लढतीपासूनच त्याच्यामध्ये स्पेशल गुण असल्याचे जाणवले होते. या स्पर्धेतील लढतींमधील कामगिरीचे विश्लेषण करताना त्याची परिपक्व वृत्ती आणि कौशल्य या दोन्ही गोष्टींनी मला प्रभावित केले. गुकेशमध्ये भविष्यातील विश्‍वविजेता होण्याचे गुण आहेत.

- डेव्हिड हॉवेल, बुद्धिबळपटू, समालोचक, इंग्लंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com