जिम्नॅस्ट दीपाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुनर्वसन प्रक्रिया सुरू; सराव सुरू करण्यास दोन महिने लागणार

पुनर्वसन प्रक्रिया सुरू; सराव सुरू करण्यास दोन महिने लागणार
मुंबई - भारतीय जिम्नॅस्टिकचा चेहरा झालेल्या दीपा कर्माकर हिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुडघ्यावरील पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तिला पुन्हा जिम्नॅस्टिकचा सराव सुरू करण्यास किमान दोन महिने लागतील, असे भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दीपाने आपण लवकरच प्रुदुनोवाऐवजी व्हॉल्टवर अन्य प्रकार करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर याबाबतचा अंतिम निर्णय मार्गदर्शक बिश्‍वेश्‍वर नंदी यांचा असेल, असेही सांगितले होते. हॅंडस्प्रिंग रुडी (व्हॉल्टवर करायचा प्रकार) करीत असताना तिचा गुडघा दुखावला. तिला लगेच मुंबईत नामवंत ऑर्थोपेडिस्ट डॉ. अनंत जोशी यांच्याकडे उपचारासाठी आणण्यात आले. डॉ. जोशी यांनी सचिन तेंडुलकरपासून अनेक क्रीडापटूंवर यापूर्वी उपचार केले आहेत.

दीपाने केलेल्या ट्विटनुसार तिच्यावर एसीएल सर्जरी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर दुखावलेल्या भागावर जास्त ताण देता येत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे दीपा आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. ही स्पर्धा 18 मेपासून आहे; मात्र ही स्पर्धा दीपाचे लक्ष्य नव्हती. पुढील वर्षाची आशियाई; तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तिच्यासाठी महत्त्वाची आहे. ती आशियाई स्पर्धेपासून दूर राहण्याचीच शक्‍यता होती, असे काही जिम्नॅस्टिक पदाधिकारी सांगत आहेत.

हाय... एक अपडेट आहे... मला सराव करताना दुखापत झाली. एसीएल शस्त्रक्रिया करण्यात आली. रिहॅब सुरू झाले आहे. नक्की लवकरच परतेन.
- दीपा कर्माकर.

जिम्नॅस्टिकसारख्या खेळात दुखापती होतातच. दीपावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तिला काही दिवसांतच रुग्णालयातून सोडण्यात येईल. त्यानंतर दोन महिने ती तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देणार आहे. त्या कालावधीत ती स्विमिंग, रनिंगच करणार आहे. त्यानंतरच ती जिम्नॅस्टिकचा सराव करणार आहे. 2020चे ऑलिंपिक दीपासाठी जास्त महत्त्वाचे आहे.
- रियाझ भाटी, भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाचे उपाध्यक्ष

Web Title: gymnast deepas knee surgery