
कसोटी क्रिकेटमध्ये कमी सरासरीमुळे त्याच्यावर टीका केली जाते पण याच पुजाराने टी20 मध्ये शतकी खेळीही केली आहे.
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघात द वॉल म्हणून राहुल द्रविडला ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर आता भारतीय संघात कोणी भरवशाचा फलंदाज असेल तर तो चेतेश्वर पुजारा. सोमवारी 25 जानेवारीला पुजारा त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. संथ खेळीमुळे आतापर्यंत त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. काही काळ त्याला संघातून बाहेरही बसावं लागलं आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत पुजाराने सर्वाधिक चेंडूंचा सामना केला. ज्यावेळी मैदानावर उभा राहण्याची गरज होती तेव्हा तो कांगारुंच्या गोलंदाजांच्या चेंडूंचा सामना करत होता. शरिराला चेंडू लागले तरीही तो खेळत राहीला. कसोटी क्रिकेटमध्ये कमी सरासरीमुळे त्याच्यावर टीका केली जाते पण याच पुजाराने टी20 मध्ये शतकी खेळीही केली आहे.
क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 928 चेंडू खेळून काढले. जगातील तो असा पाचवा फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघातील फलंदाज म्हणून इतक्या चेंडूंचा सामना केला. याआधी 2018-19 मध्ये त्याने 1258 चेंडू खेळले होते आणि सर्वाधिक 521 धावाही केल्या होत्या.
पुजाराला शुभेच्छा देताना आयसीसीने ट्विटरवर त्याला वॉल 2.0 असं म्हटलं आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असं म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy birthday, @cheteshwar1
81 Tests
6111 runs
46 fifty-plus scoresHe has three Test double hundreds to his name, including a high score of 206*
One of the grittiest batters in the game! pic.twitter.com/mGYnkpn0Lq
— ICC (@ICC) January 25, 2021
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत पुजाराने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत 6 हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो 11 वा फलंदाज ठरला. पुजाराने त्याच्या 134 व्या कसोटी सामन्यात हा माइलस्टोन गाठला आहे. तसंच कसोटीमध्ये 6 हजार धावा करणाऱ्या सर्वात वेगवान भारतीय फलंदाजांमध्ये त्याचा समावेश झाला. या यादीमध्ये सुनिल गावस्कर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर गोलंदाजांची दमछाक करणाऱ्या चेतेश्वर पुजारा संथ खेळतो म्हणून फलंदाजीवर टीकाही केली जाते. पण याच पुजाराने 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतकी खेळी केली होती. सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने रेल्वेविरुद्ध 61 चेंडूत ही कामगिरी केली होती. टी20 मध्ये अशी खेळी करणारा तो सौराष्ट्रचा पहिलाच फलंदाज ठरला होता.