HBD Cheteshwar Pujara: आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टिस, आता टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन

सकाळ ऑनलाइन टीम
Monday, 25 January 2021

राहुल द्रविडनंतर पुजाराने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 5000 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. त्याने 81 कसोटीत 18 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 6111 रन्स केले आहेत. 

नवी दिल्ली- टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 जानेवारी 1988 रोजी राजकोटमध्ये जन्मलेला पुजारा आज टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज आहे. तो गेल्या एक दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी त्याला मोठे कष्ट घ्यावे लागले. या काळात त्याला त्याच्या कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा मिळाला. राहुल द्रविडनंतर पुजाराने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 5000 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. त्याने 81 कसोटीत 18 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 6111 रन्स केले आहेत. 

पुज्जी नावाने प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वरने नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात यश मिळवले. पुजाराने या मालिकेत 928 चेंडूंचा सामना केला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला. यादरम्याने त्याने 3 अर्धशतके ठोकली. यात गब्बा येथे केलेल्या 56 धावांची खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली. कसोटी क्रिकेटपटू होण्यासाठीचा त्याचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. चेतेश्वर पुजाराला क्रिकेटर करण्यासाठी त्याच्या आईने आपल्या मुलासाठी काय-काय केले हे आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा- Record Book: तब्बल 970 मिनिटे बॅटिंग करणारा खेळाडू, 42 वर्षांनंतर मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

चेतेश्वर पुजाराची आई रिना यांनी आपला मुलगा भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. पुजाराचे वडील अरविंद यांनी आपल्या मुलाची प्रतिभा ओळखली होती. त्यामुळे त्यांनी तसा त्याचा सरावही सुरु केला होता. अरविंद पुजारा हे स्वतः रणजी ट्रॉफीपर्यंत खेळले होते. परंतु, चेतेश्वरला पहिली बॅट त्याची आई रिना यांनी भेट म्हणून दिली होती. आईने 1500 रुपयांची बॅट घेतली होती. चेतेश्वरच्या आईने या बॅटचे पैसे हप्त्याने परत केले होते. त्यावेळी चेतेश्वर केवळ 8 वर्षांचा होता. उंची कमी असल्यामुळे त्याला इतरांचे बॅटिंग पॅड्सही व्यवस्थित येत नसत. त्यावेळी आईने चेतेश्वरला आपल्या हातांनी पॅड्सची जोडी तयार केली होती. 

पुजाराने आपल्या आईने दिलेल्या भेटीचा सन्मान राखत मेहनत करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आपली जागा पक्की केली. पुजाराचे भारताकडून खेळण्याचे स्वप्नही साकार केले. परंतु, चेतेश्वरला एका गोष्टीचे आजही मोठे दुःख आहे. कारण ज्या आईने त्याच्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. त्या मुलाचे भारताकडून पदार्पण होतानाचा क्षण पाहू शकल्या नाहीत. त्याच्या डेब्यूपूर्वीच आई रिना यांचे कॅन्सरने निधन झाले होते. 

हेही वाचा- रिक्षावाल्याचा मुलगा असण्याचा क्रिकेटशी काय संबंध? माजी फिरकीपटूची 'गूगली'

आपल्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी चेतेश्वरने कोणतीच कसर सोडली नाही. चेतेश्वरने  9 ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अजूनही यशस्वीपणे सुरुच आहे. त्याच्याबाबत म्हटलं जातं की, तो 300 धावा केल्यानंतर जर बाद झाला तरी तो स्वतःवर नाराज असतो. त्याच्या या दृढतेचा फायदा टीम इंडियाला नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाहायला मिळाला. पुजाराने 140 च्या वेगाने येणारे बॉल शरीरावर झेलूनही क्रीजवरुन काही काढता पाय घेतला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheteshwar pujara cheteshwar pujara turns 33 happy birthday