Hardik Pandya : हार्दिक पांड्या म्हणतो; संघ जिंकत असताना 80 धावा करणं मला आवडत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Philosophy

Hardik Pandya : पांड्या म्हणतो; संघ जिंकत असताना 80 धावा करणं मला आवडत नाही

Hardik Pandya Philosophy : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने सुपर 12 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवून धरायला लावणाऱ्या या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी रचली. विराट कोहलीने 53 चेंडूत 82 तर हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावांची खेळी केली. याचबरोबर गोलंदाजीतही त्याने 30 धावात 3 विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला. दरम्यान, सामना झाल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाने सामन्याचा हिरो हार्दिक पांड्याशी संपर्क साधला. त्यावेळी असा हाय व्होल्टेज सामना खेळताना तुमची तयारी आणि मानसिकता कशी असते याबाबत हार्दिक पांड्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

हेही वाचा: Urvashi Rautela: आता रिषभ नव्हे तर विराटच्या प्रेमात पडली उर्वशी....दिवाळी निमित्तानं केली खास पोस्ट...

जवळपास 130 कोटी जनतेचे डोळे तुमच्यावर खिळले असताना अशा अटीतटीच्या सामन्यात तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवता असे हार्दिक पांड्याला विचाण्यात आले. त्यावेळी त्याने भन्नाट उत्तर दिले. तो म्हणाला की, 'तुम्हाला अशाच सामन्यात हिरो बनण्याची संधी असते. मला दबावात खेळताना आनंद वाटतो.'

हार्दिक पांड्या अशा आव्हानात्मक परिस्थिती कोणत्या मानसिकतेने खेळतो याबाबत तो म्हणतो की, 'मला सामना आम्ही जिंकणारच आहे अशा परिस्थितीत कामगिरी करायला फारसं आवडत नाही. आम्ही जिंकणार आहोत हे निश्चित असताना मी 80 धावा करणं हे मला आवडत नाही. मला संघाला अत्यंत गरज असताना त्या 40 ते 50 धावा करणं आणि विजयाला हातभार लवणं आवडतं. याचबरोबर मी अपयशाची भिती मनातून काढून टाकली आहे. आता मला अपयशाने काही फरक पडत नाही. जास्तीजास्त काय होईल लोकं जो काही निकाल लागला आहे त्यावरून तुम्हाला बोलतील. मी सर्वांच्या मताचा आदर करतो. मात्र मी काय निकाल लागणार याबाबत विचार करत नाही.'

हेही वाचा: Serena Williams : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! टेनिस कोर्टवरील 'महाराणी' परतणार?

यावर हार्दिक पांड्याला जर भारताला पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विजयासाठी 1 धाव कमी पडली असती तर त्यानंतर तुझा दृष्टीकोण असाच असता का असे देखील विचारण्यात आले. त्यावेळी पांड्याने 'मी सांगितलं आहे की जरी तीन चेंडू राहिले असते तरी सर्वांना सांगितले असते की आपण हरलो तरी ठिक आहे आपण शेवटपर्यंत लढत तर दिली.'

पांड्या पुढे म्हणाला, 'वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणूनही आम्ही आम्ही खूप कष्ट करतोय. जरी आम्ही हरलो असतो तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य असतं. आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावलं होतं. शेवटी मी हे मान्य केलं आहे की हा खेळ असा आहे जो तुम्हाला कधी शिखरावर तर कधी खाली आणतो. जेवढी शिखरं पार करता येतील ते चांगलं आहे. जरी कधी कधी खाली पडलो तरी ठीक आहे. मी तो प्रत्येक क्षण साजरा करेन कारण अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जातं.'

हेही वाचा: Video : ना नो-बॉल, ना वाइड, तरीही आफ्रिकेने फुकट दिल्या 5 धावा, काय सांगतो नियम?

विराटने हारिस रौऊफला 19 व्या षटकात दोन षटकार मारले त्याबद्दल पांड्या म्हणाला, 'मी सहसा शांत असणारा व्यक्ती आहे. मात्र त्यावेळी मी ओरडत होतो. हे खूप काही सांगून जातं. आमच्यासाठी ते अत्यंत महत्वाचे फटके होते. जरी त्या दोन षटकारांमधील एक षटकार जरी आम्हाला मिळाला नसता तर आम्हाला शेवटच्या षटकात खूपच अवघड गेलं असतं. मी एका सुंदर क्षणाचा साक्षीदार झालो.'