पुण्यात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

हिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर ट्रस्टचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यापूर्वी ट्रस्टने शताब्दी वर्षात म्हणजे 1992 मध्ये हिंद केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. आणि पुन्हा हा मान आम्हाला मिळाला आहे.

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 27 ते 30 एप्रिल दरम्यान होत आहे. 

पुणे महापालिकेच्या बाबूराव सणस मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने होणारी ही स्पर्धा तीन दिवस होणार आहे. या स्पर्धेसाठी 29 राज्यातील सुमारे 280 खेळाडू यांत भाग घेणार आहेत. हिंद केसरी किताब मिळविणाऱ्या विजेत्यास दोन लाख 50 हजार रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण चौदा लाख 65 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हिंद केसरी किताबासह (82 ते 130 किलो) 50 वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा 51 किलो, 55 किलो, 63 किलो, 67 किलो, 75 किलो, 85 किलो आणि 82 ते 100 किलो या गटात होत आहे. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा या मातीच्या आखाड्यावर रंगणार आहेत. 

हिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर ट्रस्टचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यापूर्वी ट्रस्टने शताब्दी वर्षात म्हणजे 1992 मध्ये हिंद केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. आणि पुन्हा हा मान आम्हाला मिळाला आहे. अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड, काका पवार, नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी हे उपस्थित होते. 

Web Title: Hind Kesari wrestling championship begins in Pune on Thursday