संघनिवडीतील सातत्याने महिला हॉकी संघात समन्वय वाढला ः राणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

भारतीय महिला हॉकी संघाची निवड करताना त्यात फारसे बदल होत नव्हते, त्यामुळे संघातील सामंजस्य तसेच खेळातील समन्वय वाढण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने केले.

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाची निवड करताना त्यात फारसे बदल होत नव्हते, त्यामुळे संघातील सामंजस्य तसेच खेळातील समन्वय वाढण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने केले.

भारतीय महिला हॉकी संघ नोव्हेंबरच्या सुरुवातीस भुवनेश्वरला अमेरिकेविरुद्ध ऑलिंपिक पात्रता लढती खेळणार आहे. या लढतीच्यावेळी चाहत्यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरेल, असे राणीने सांगितले. या लढतींसाठी भारताने इंग्लंड दौऱ्यावरील संघ कायम ठेवला आहे.

आम्ही संघातील बहुतेक खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून एकमेकींच्या साथीत खेळत आहोत. त्यामुळे आम्हाला संघातील प्रत्येक खेळाडूच्या खेळाची पूर्णपणे जाणीव आहे. त्याचा फायदा नक्कीच खेळताना होतो. आता आम्ही लढतीच्या पूर्वतयारीवर पूर्ण लक्ष केंद्रीत केल्याचे राणीने सांगितले.

भुवनेश्वरने कायम भारतीय संघास प्रोत्साहित केले आहे. ते पहिल्या मिनिटापासून प्रोत्साहन देतात. जोरदार प्रोत्साहन असताना लढत खेळणे हा एक वेगळाच अनुभव असतो, असे राणीने सांगितले. या सामन्यांचे महत्त्व आम्ही जाणतो, पण त्याचे दडपण येणार नाही याकडे लक्ष देत आहोत. या प्रकारच्या लढतींचा आम्हाला चांगला अनुभव आहे. योजनेनुसार खेळ केला, तर काहीही अशक्‍य नाही याची आम्हाला जाणीव आहे, असे तिने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hockey captain rani rampal happy on team selection consistency