मग मी स्वतःला सांगतो, हा तुझा शेवटचा सामना आहे

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

वेस्ट इंडिज दौऱ्यात फलंदाज म्हणून आपली ओळख ठळक करणारा हनुमा विहारी याने आपण प्रत्येक कसोटी सामना अखेरचा मानूनच खेळ करतो. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. 

नवी दिल्ली  - वेस्ट इंडिज दौऱ्यात फलंदाज म्हणून आपली ओळख ठळक करणारा हनुमा विहारी याने आपण प्रत्येक कसोटी सामना अखेरचा मानूनच खेळ करतो. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. 

विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात 25 वर्षीय विहारीने सर्वाधिक 291 धावा केल्या. अनुभवी रोहित शर्माला डावलून संघात स्थान देण्याचा संघ व्यवस्थापनाचा विश्‍वास विहारीने सार्थ करून दाखवला. आपल्या कामगिरीबद्दल विहारी म्हणाला,""नक्कीच, या दौऱ्यातील माझ्या कामगिरीवर मी खूप समाधानी आहे. एका वेळेस एकाच कसोटीचा विचार केला. असाही मी प्रत्येक कसोटी सामना अखेरचा समजूनच खेळतो. त्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा मिळते. आपल्याकडे गमाविण्यासारखे काही नाही. जो काही खेळ होईल त्यातून आपण काही तरी कमावणारच आहोत, हे मनाला समजावून सांगत असतो. त्यामुळे प्रत्येक सामना दृढनिश्‍चयाने खेळण्याची माझी मानसिकता तयार होते.'' 

विंडीज दौऱ्यानंतर कर्णधार कोहलीने विहारीला या दौऱ्यातील "फाईंड' मानले. विहारी म्हणाला,""माझ्या खेळाला मिळालेली ही सर्वोत्तम पावती आहे. कर्णधाराकडून जेव्हा कौतुक होते तेव्हा खेळाडूला वेगळाच आनंद होते. जेव्हा ड्रेसिंगरुममधील प्रत्येक व्यक्ती तुमच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवत असते, तेव्हा तुम्हाला वेगळ्या प्रोत्साहनाची गरज भासत नाही.'' 

विहारीला हे यश,कौतुक आका रात्रीत मिळालेले नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत त्याने घेतली आहे. आपल्या प्रवासाबद्दल बोलताना विहारी म्हणाला,""सुरवातीपासून मेहनत घेण्यावर भर दिल्यामुळेच मला हे यश मिळाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी आतापर्यंत 60 प्रथम श्रेणी सामने खेळलो आहे. अनेक दडपणाचे प्रसंगही अनुभवले आहेत. त्यामुळेच मी मोठी आव्हाने झेलण्यासाठी समर्थ होऊ शकलो.'' 

कुठल्याही क्रमांकावर खेळण्याची माझी तयारी आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्न कसोटीत डावाची सुरवात करण्याची संधी मिळाली. त्या संधीकडे मी आव्हान म्हणून पाहिले आणि सामोरा गेलो. अशी आव्हाने स्विकारण्यास मला आवडतात कारण, त्यामुळे क्षमता दाखवण्याची संधी मिळत असते. 
-हनुमा विहारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I play like its my last game says hanuma vihari