
ICC Test Ranking: आयसीसीने भारताला पुन्हा एकदा गंडवलं! काही तासांत सिंहासनावरून उतरवले खाली
Team India ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे रैंकिंग नेहमीच चर्चेचे कारण असते. दर आठवड्याला जाहीर होणाऱ्या क्रमवारीत खेळाडूंच्या स्थानांमध्ये बदल होत असतात. संघांच्या क्रमवारीत चढ-उतार होत असतात. आजकाल भारतीय क्रिकेट संघ आश्चर्यचकित होत आहे, जो खेळाडूंच्या क्रमवारीत तसेच संघाच्या क्रमवारीत वर्चस्व गाजवत आहे. पण यावेळी आयसीसीने भारताला पुन्हा एकदा गंडवलं आहे. टीम इंडियाला आधी सिंहासनावर बसवलं त्यानंतर काही तासांत खाली उतरवले.
ICC ने या आठवड्यासाठी नवीन क्रमवारी जाहीर केली, रविचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले. त्याचबरोबर संघाच्या क्रमवारीतही बदल झाला. ज्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
टीम इंडियाने गेल्या आठवड्यातच पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते आणि त्यामुळे हा बदल योग्य वाटला होता पण रेटिंग पॉइंट्समध्ये प्रचंड बदल झाल्यामुळे शंका होती.

संध्याकाळी उशिरा आयसीसीने पुन्हा क्रमवारीत बदल केला. त्यामुळे ही शंका देखील खरी ठरली. दुपारी 1 च्या सुमारास झालेल्या बदलानंतर टीम इंडिया 115 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचली, तर ऑस्ट्रेलियाचे 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. या अपडेटमुळे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली होती.
पण संध्याकाळी सुमारास पुन्हा क्रमवारी अपडेट करण्यात आली आणि यावेळी ऑस्ट्रेलियाने पुन्हा पहिल्या स्थानावर पुनरागमन केले. यावेळी त्यांना पुन्हा 126 गुण मिळाले, तर टीम इंडियाचे केवळ 115 गुण होते.

आयसीसीच्या या चुकीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे सर्वांनाच वाटत होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही संध्याकाळी एक ट्विट करून टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनल्याबद्दल अभिनंदन केले. त्याचे हे ट्विटही चुकीचे ठरले, कारण अवघ्या 6 तासांत टीम इंडियाला सिंहासनावर खाली उतरवले.