IND vs AUS : नागपुरात चर्चा लढतीची नव्हे, केवळ पावसाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS

IND vs AUS : नागपुरात चर्चा लढतीची नव्हे, केवळ पावसाची

India vs Australia 2022 2nd T20I : विश्वकरंडकाची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला दोनशेच्या वर धावा काढूनही हार पत्करावी लागली. त्यामुळे आता मालिका विजयाची आशा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत आज नागपुरात विजय मिळविणे आवश्यक आहे.

एकीकडे भरकटलेली प्रभावहीन गोलंदाजी आणि दुसरीकडे पावसाचे संभाव्य संकट, या दुहेरी परिस्थितीला सामोरे जाताना टीम इंडियापुढे मालिका बरोबरीचे फार मोठे आव्हान राहणार आहे. भारतीय संघाने मोहालीतील चुकांमध्ये सुधारणा केल्या आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रदर्शन केल्यास विजयाची निश्चितच संधी आहे. ही चर्चा तर आहेच. मात्र, पाऊस आला तर सामना होणार का, ही चर्चा जोरदार रंगू लागली आहे.

हेही वाचा: Team India: भुवनेश्वर कुमारचं करिअर संपणार? लवकरच टीम इंडियात 'या' गोलंदाजाची एंट्री

भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या, शुक्रवारी (ता. २३) येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असल्याने भारतासाठी ही लढत एकप्रकारे "करो या मरो" अशीच राहणार आहे. त्यामुळे भारतीय संघ निश्चितच विजयासाठी आपली संपूर्ण ताकद झोकून देणार आहे; परंतु टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग वाटतो तितका सोपा निश्चितच नाही.

विजय मिळविण्यासाठी संघासमोर डेथ ओव्हर्स च्या समस्येसोबतच पावसाचेही मोठे आव्हान राहणार आहे. नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी येताहेत. शिवाय हवामान विभागाने शुक्रवारीही जोरदार पावसाचा (यलो अलर्ट) अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या सामन्यात वरुणराजा गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे पावसाळी वातावरण लक्षात घेता संपूर्ण मैदान कव्हरने झाकण्यात आले आहे.

हेही वाचा: PAK vs ENG: 'टॉयलेटपर्यंत आमचा...', पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त

पुनरावृत्तीचा कांगारूंचा प्रयत्न

भारताच्या तुलनेत पाहुण्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीही सरस राहिलेली आहे, शिवाय क्षेत्ररक्षणानेही प्रभावित केले आहे. त्यामुळे मोहालीची पुनरावृत्ती नागपुरातही करून मालिका खिशात घालण्याचा कांगारूंचा प्रयत्न राहणार आहे. शहरात जवळपास तीन वर्षांनंतर टी-२० सामना होत असल्यामुळे नागपूरकर क्रिकेटशौकिनांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

शहरात सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्ही संघ आज नियमित सराव करू शकले नाहीत. संभाव्य धोका लक्षात घेता खेळाडूंनी हॉटेलमध्येच आराम करणे पसंत केले. पावसामुळे सामन्यात एकही चेंडू पडला नाही तर त्या परिस्थितीत प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय व्हीसीएने घेतला आहे. व्हीसीएने या सामन्यासाठी पाच कोटींचा विमा काढला आहे.

Web Title: Ind Vs Aus 2nd T20 Rain Could Play Spoilsport In Nagpur Jasprit Bumrah Rohit Sharma Virat Kohli Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..