
IND vs AUS: भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियात भूंकप! डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर?
India vs Australia Test Series : नागपूर कसोटीत भारताचा डाव आणि 132 धावांनी पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या दिल्ली कसोटीत कर्णधार पॅट कमिन्स आणि संघ व्यवस्थापन काही मोठे निर्णय घेण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दिल्ली टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियन संघ दिल्ली कसोटी सामन्यात यावेळी तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेऊ शकतो. ज्यामध्ये क्वीन्सलँडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनला कसोटी पदार्पण खेळण्याची संधी मिळू शकते. खरं तर राखीव लेग-स्पिनर म्हणून संघात समाविष्ट केलेला मिचेल स्वेपसन त्याच्या पहिल्या अपत्याच्या जन्मामुळे देशात परतत आहे. अशा परिस्थितीत कुहनेमनचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन मीडिया द एजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन संघाच्या एका सूत्राने त्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा विचार केला जात आहे. नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नरने दुसऱ्या डावात केवळ 10 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज कुहनेमनने नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगच्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. त्याने 18 सामन्यात 16 विकेट घेतल्या. दुसरीकडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन अ संघाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या मॅट कुहनेमनने 34 च्या सरासरीने 32 बळी घेतले आहेत. मात्र कॅमेरून ग्रीन पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच कांगारू संघ त्याचा समावेश करू शकतो.