
India vs Australia 3rd Test : नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यात एकहाती विजय मिळवल्यानंतर भारतासाठी आता इंदूरमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला, तर लंडनमध्ये होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे तिकीट पक्के होणार आहे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेली बॉर्डर-गावसकर करंडक मालिकाही जिंकता येणार आहे.
नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यात राहिलेला फिरकीचा पॅटर्न इंदूरमध्येही असणार याचे संकेत खेळपट्टीचे स्वरूप पाहून निश्चित होत आहे. फरक एवढाच की ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वात बदल होणार आहे आणि संघातही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कसे आव्हान उभे करतो, यावर या तिसऱ्या कसोटीची रंगत ठरणार आहे.
खेळपट्टीचा रागरंग बघता दुसऱ्या डावात धावा करणे दोनही बाजूच्या फलंदाजांना चांगलेच कठीण जाणार आहे. त्यामुळे पहिल्या डावातील धावसंख्या सामन्याचे भवितव्य ठरवेल. काही झाले तरी 300 धावा करायचा, अशी जिद्द ऑस्ट्रेलिया संघाने बाळगली आहे.
इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचे एक जीवनचक्र जणू काही पूर्ण होत आहे. अगोदर ऑस्ट्रेलियन संघाचा कप्तान असलेला स्मिथ बॉल कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरला आणि दोन वर्षांची बंदीची शिक्षा पूर्ण करून संघात परतला. आता तोच स्टीव्ह स्मिथ पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाला विजयापासून रोखण्याचे मोठे आव्हान स्मिथसमोर आहे.
ऑसी फलंदाजांनी भारतीय फिरकीचा घेतलेला धसका मनोधैर्याला धक्का लावून गेला आहे. ‘दडपणाखाली कागदावर आखलेल्या योजना राबवायचे आव्हान मला खुणावत आहे. मान्य आहे की गेल्या दोन कसोटीत आमचा खेळ मनासारखा झालेला नाही. संघातील गुणवत्ता बघता आम्ही नक्कीच पुनरागमन करू शकतो. फक्त फलंदाजांना योग्य धावा फलकावर लावायचे आव्हान पेलावे लागेल. नजर बसायच्या आत कोणी फलंदाज बाद झाला, तर दोष देता येत नाही. जम बसल्यावर मात्र मोठी खेळी उभारता आलीच पाहिजे, असे मला वाटते, असे स्मिथने सांगितले.
मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन संघात परतल्यावर फलंदाजीसोबत गोलंदाजीतला चांगले पर्याय माझ्या हाती असतील, असेही स्मिथने सांगितले.
राहुलऐवजी गिलला संधी?
केएल राहुलवरून बरीच चर्चा झालेली आहे. त्याच्याकडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात राहुलऐवजी शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या दिवशी गिल अधिक सराव करताना दिसून आला.
द्रविडची ऑफस्पिन गोलंदाजी
सरावादरम्यानचे एक दृश्य मजेदार होते. श्रेयस अय्यरला चक्क राहुल द्रविड ऑफस्पीन गोलंदाजी करून सराव देताना दिसला. दिवसभर होळकर मैदानावरील खेळपट्टी पातळ आच्छादनाने झाकली गेली होती. कडक उन्हापासून खेळपट्टीचा बचाव करायचा प्रयत्न त्यामागे होता. गेल्या दोन दिवसात अगदी कमी पाणी खेळपट्टीवर मारले गेलेले दिसले. याचाच अर्थ खेळपट्टी कोरडी ठेवण्याचा पर्याय निवडला गेला आहे.