
IND vs AUS : 'लक्ष्य फार मोठे नव्हते, आम्हाला खेळता आलं नाही...' चूक मान्य करत रोहित खेळाडूंवर बरसला
Ind vs Aus ODI Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाने तीन वनडे मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना चेन्नईत खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 21 धावांनी जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका जिंकली. 2019 नंतर ऑस्ट्रेलिया हा एकमेव देश आहे ज्याने मायदेशात द्विपक्षीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला 270 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना रोहित शर्माच्या टीम इंडियाला 248 धावा करता आल्या. विराट कोहलीने 54 धावांची खेळी खेळली. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज होता. त्याच्याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने 4 तर अॅश्टन एगरनेही २ बळी घेतले.
सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले. रोहित म्हणाला, “मला वाटत नाही की ऑस्ट्रेलियाची धावसंख्या इतकी मोठी आहे. दुसऱ्या डावात विकेट नक्कीच थोडी आव्हानात्मक होती. मला वाटत नाही की आम्ही चांगली फलंदाजी केली. अशा विकेटवर भागीदारी महत्त्वाची असते. पण आजच्या सामन्यात आम्हाला तसे करण्यात अपयश आले. फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले, हा विचार करण्याची बाब आहे. कारण आम्ही अशा विकेटवर खेळून मोठे झालो आहोत.
रोहित पुढे म्हणाला, अनेकदा तुम्हाला विकेट आणि परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करावे लागते आणि स्वतःला संधी द्यावी लागते. एका फलंदाजाने सामना शेवटपर्यंत नेणे महत्त्वाचे होते. आपण सर्व चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, या सामन्यात तसे होऊ शकले नाही. जानेवारीपासून आतापर्यंत आम्ही 9 वनडे खेळलो आहोत. या सामन्यांमधून आपल्याला अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळतात. हे आमचे सामूहिक अपयश आहे. आम्ही ५ महिन्यांनंतर अशाच परिस्थितीत खेळताना दिसणार आहोत. याचे श्रेय तुम्ही ऑस्ट्रेलियालाही द्यावे लागेल.