
IND vs AUS : सर्व काही पणाला... भारतीयांसाठी एक सामना अन् दोन उद्दिष्ट
IND vs AUS : इंदूर येथील कसोटी सामना गमावल्यामुळे खडबडून जाग आलेल्या भारतीय संघासमोर आता एक सामना आणि दोन उद्दिष्ट गाठण्याची वेळ आली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या चौथा कसोटी सामन्यासह मालिका विजय आणि त्याचबरोबर कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना निश्चित करण्यासाठी भारतीयांना लढावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांत मायदेशातील प्रत्येक मालिका जिंकणाऱ्या भारतासमोर प्रथमच असे आव्हान उभे राहिले आहे.
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणारा बॉर्डर-गावसकर करंडकाचा चौथा कसोटी सामना भारतीयांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारा आहे. त्यातच दोन्ही देशांचे पंतप्रधान सामन्याच्या पहिल्या सत्राचा खेळ बघायला हजर राहणार असल्याने संपूर्ण अहमदाबादला जणू जाग आली आहे.
भारतात येऊन दोन सलग कसोटी सामने जिंकण्याची किंवा मालिका बरोबरीत सोडवण्याची किमया नजीकच्या भूतकाळात कोणत्याच पाहुण्या संघाला जमलेली नाही. दोन कसोटी सामन्यातील पराभवाने भेदरून गेलेला संघ इंदूर कसोटी सामना जिंकल्याने कांगारूंच्या शेपट्या लगेच वर झाल्या आहेत.
किमान चार दिवस सामना चालणार?
खेळाडूंना आणि खास करून दोनही बाजूच्या फलंदाजांना एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे ती म्हणजे अहमदाबादच्या खेळपट्टीचा स्वभाव. सामन्याच्या आदल्या दिवशी नजर टाकली असता खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पहिल्या दिवशीपासून अनावश्यक मदत करायला लागेल, असे वाटत नाहीये. त्याच आशावादाला धरून म्हणावेसे वाटते की शेवटचा कसोटी सामना कदाचित किमान चार दिवस चालेल.
फिरकीला साथ, पण नंतर...
अहमदाबादच्या खेळपट्टीवरचे गवत अगदी ब्रश वापरून उभे करून कापले गेलेले असले, तरी मातीला बांधून ठेवण्याइतपत त्याचा प्रभाव राहील, असे वाटत आहे. खेळपट्टी फिरकीला साथ देईल ती दुसऱ्या दिवशीपासून, असे माळी खात्री देत खासगीत बोलताना सांगत होते. मालिकेत दोन्ही संघातील फलंदाजांना अगदी १०-२० धावा जमा करायला प्रचंड झगडावे लागले आहे. स्टीव्ह स्मिथ, विराट कोहलीसारख्या जुन्या-जाणत्या अनुभवी फलंदाजांना एकही प्रभावी खेळी उभारता आली नाही, यावरून खेळपट्टीने फलंदाजांची बघितलेली सत्त्वपरीक्षा लक्षात येऊ शकते. फलंदाजी सोपी होत नसली, तरी प्रत्येकाला आपल्या शैलीचा विचार करून धावा जमा करायचे तंत्र शोधावे लागणार आहे.
‘डीआरएस’बाबत जागरूक राहणार
इंदूर कसोटी सामन्यात खूप लवकर तिन्ही डीआरएस कौल मागितले गेले आणि तीनही चुकीचे ठरले. भारतीय संघाला तीच चूक शेवटच्या कसोटीत करून चालणार नाही. होते काय, की प्रत्येक गोलंदाजाला फलंदाजाला आपण बाद केले आहे याची खात्री वाटत असते. त्यातून यष्टिरक्षक भरतला डीआरएसची सवय नाही, कारण प्रथम श्रेणीच्या सामन्यात डीआरएस नसते. गेल्या सामन्यात जडेजाने अपील केलेले चेंडू यष्टींपासून खूप लांबून जात होते. आम्हाला जागरूक राहणे गरजेचे आहे, रोहित शर्मा म्हणाला.
नाणेफेकीचे महत्त्व कमी
दोन देशांचे पंतप्रधान सामन्याच्या पहिल्या दिवशी हजर राहणार असल्याचा आनंद आहे. संघ म्हणून आम्हाला तो समारंभ साजरा करून नंतर लगेच खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. गेल्या सामन्यात पहिल्या डावात आम्ही कमी धावा फलकावर लावल्या तीच चूक आमच्या बोकांडी बसली. अजून एक गोष्ट म्हणजे तीनही कसोटी सामन्यांत नाणेफेक जिंकणारा संघ सामना हरला आहे. याचाच अर्थ असा, की नाणेफेकीचा कौल सध्याच्या मालिकेत महत्त्वाचा नाहीये, असे रोहित शर्माने हसत हसत नमूद केले.
सिराजऐवजी शमी
चौथ्या कसोटी सामन्याकरिता भारतीय संघात कदाचित एकमेव बदल मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमी येणे इतकाच असेल. चर्चा होत असली, तरी भरतची जागा इशान किशनला दिली जाणार नाही, असे वाटते. ऑस्ट्रेलियन संघातही बदल होण्याची शक्यता वाटत नाही. स्मिथ असो वा रोहित शर्मा एकच प्रयत्न जोराने करतील, तो म्हणजे पहिल्या डावात चांगली फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा फलकावर लावण्याचा. यशाचा मार्ग पहिल्या डावातील चांगल्या खेळानेच दिसणार असल्याची जाणीव दोन कर्णधारांना पक्की आहे.
सकाळी गर्दी होणार
सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाची खूप कमी तिकिटे सामान्य क्रिकेट चाहत्यांसाठी खुली केली गेली आहेत. जास्त तिकिटे स्थानिक राजकारण्यांना देऊ केली असून त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मैदानावर येण्याचे आदेश दिले गेल्याचे समजले आहे. दोन्ही पंतप्रधान मैदानावर दाखल होताना जोरदार आवाजी पाठिंबा दिला गेला पाहिजे, असे निर्देश दिले गेले आहेत. धोका एकच आहे, तो म्हणजे जर राजकारणी आणि चाहते खरे क्रिकेटप्रेमी नसले, तर सामना चालू होताना मैदान प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले दिसेल आणि उपाहारानंतर मोकळे दिसेल.