WTC Final 2023 : कांगारूंची मान ताठ! स्टीव स्मिथही शतकाच्या उंबरठ्यावर भारतीय गोलंदाज अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus WTC Final 2023

WTC Final 2023 : कांगारूंची मान ताठ! स्टीव स्मिथही शतकाच्या उंबरठ्यावर भारतीय गोलंदाज अपयशी

Ind vs Aus WTC Final 2023 : हिरवे गवत असलेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण अशा पोषक वातावरणात सुरुवातीला गोलंदाजी करण्याची मिळालेली संधी भारतीयांना फलदायी ठरली नाही. भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करून ट्रॅव्हिड हेडने शानदार शतक (नाबाद १४६) केले त्यामुळे जागतिक कसोटी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेर ३ बाद ३२७ धावा केल्या. स्टीव स्मिथ ९५ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी नाबाद २५१ धावांची भागीदारी केली.

खरं तर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा भारतीय कप्तान रोहित शर्माचा निर्णय बऱ्यापैकी लाभ देऊन गेला होता. सलामीच्या जोडीसह लबुशेनला बाद करण्यात यश आल्याने ३ बाद ७६ धावसंख्येवर स्टीव्ह स्मिथला ट्रॅव्हिड हेड येऊन मिळाला. दोघांनी मिळून चहापानापर्यंत ९४ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियन संघाला जरा सुस्थितीत नेले.

ओव्हल मैदानावर सामना चालू होताना आकाशात ढग आणि हवेत किंचित गारवा जाणवत होता. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतल्यावर मैदानात उतरताना बऱ्याच खेळाडूंनी पूर्ण बाह्याचे स्वेटर घातलेले दिसले. डाव्या दंडावर काळी पट्टी बांधून आणि सामन्याअगोदर खेळाडूंसह प्रेक्षकांनी एक मिनीट स्तब्धता पाळून ओडीसातील रेल्वे दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सामन्याचे चौथे आणि आपले दुसरे षटक टाकताना सिराजने उस्मान ख्वाजाला झेलबाद करवले.

पहिल्या काही षटकात शमीने पुढे जास्त चेंडू टाकले नाहीत. जम बसवायला वेळ घेऊन मग डेव्हीड वॉर्नरने उमेश यादवच्या गोलंदाजांवर लागोपाठ चौकार मारून धावफलकाला गती दिली. समोर खेळणाऱ्‍या मार्नस लबुशेन काहीसा चाचपडत होता. सिराजचा एक चेंडू लबुशेनच्या डाव्या अंगठ्यावर आदळला. दोन वेळा त्याच्या विरुद्धचे पायचीतचे अपील फेटाळले गेले. ८ चौकारांसह ४३ धावांवर खेळणाऱ्‍या वॉर्नरला उपाहाराअगोदर शार्दूल ठाकूरने बाद केल्याने भारतीय संघाच्या जिवात जीव आला.

उपाहारानंतर शमीने पुढे चेंडू टाकला आणि योग्य परिणाम झाला. अडखळत खेळणारा लबुशेन बोल्ड झाला. सुरुवातीचे तीन फलंदाज बाद केल्याने भारतीय संघासमोर मोठी संधी निर्माण झाली. कडक उन्हामुळे ओव्हलच्या खेळपट्टीतील ताजेपणा उडून गेला. चेंडूपण थोडा नरम झाला. स्मिथ सावध खेळत असताना हेडने पहिल्यापासून एकदम सकारात्मक फलंदाजी केली. रोहित शर्माने सर्व पर्याय वापरून बघितले पण स्मिथ- हेड जोडीने दाद लागून दिली नाही.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः ८५ षटकांत ३ बाद ३२७ (डेव्हिड वॉर्नर ४३, स्टीव स्मिथ खेळत आहे ९५, ट्रॅव्हिस हेड खेळत आहे १४६ -१५६ चेंडू, २२ चौकार, १ षटकार, मोहम्मद शमी २०-३-७७-१, मोहम्मद सिराज १९-४-६७-१, शार्दुल ठाकूर १८-२-७५-१)