T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs BAN weather forecast

T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट

IND vs BAN Weather Forecast : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला नेहमीच एक धार असते. त्याचे कारण असे आहे, २००७ मध्ये वर्ल्डकप (५०-५० षटकांचा) सामन्यात बांगलादेशने तगड्या भारतीय संघाला पराभूत केले, तेव्हापासून त्यांचे खेळाडू आणि चाहते समजत आले आहेत, की बांगलादेशचा संघ भारतीय संघाला कधीही पराभूत करू शकतो. भले कागदावर भारताचा संघ खूप वरचढ दिसत असला तरी बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करायला संघ व्यवस्थापन अजिबात तयार नाही. सामन्याच्या दिवशी पावसाने घोळ घातला नाही, तर हा सामना म्हणजे उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणारा ठरणार आहे.

हेही वाचा: T20WC22 Point Table : श्रीलंका किंग मेकर! 'या' सामन्यावर ठरणार इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे भवितव्य

स्पर्धेत भारतीय संघाने खेळलेले तीनही सामने मजेदार झाले. एका सामन्यात शेवटच्या षटकात विजय; तर एका सामन्यात शेवटच्या षटकात पराभव झाला. भारतीय संघाला फलंदाजीत चांगली सुरुवात, गोलंदाजीतील शेवटच्या ५ षटकांतील मारा आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा अशा तीन आव्हानांना तोंड देत बांगलादेश संघासमोर सामना खेळायचा आहे. माध्यमातून के. एल. राहुलच्या अपयशावर टीका होत असली तरी भारतीय संघ राहुललाच पाठिंबा देणार असल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ असा, की संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. दीपक हुडाला अजून एक संधी मिळेल असे वाटते.

हेही वाचा: ENG vs NZ : इंग्लंड - न्यूझीलंडने मिळून यजमान ऑस्ट्रेलियाचीच गोची केली?

बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाज जास्त चेंडू वळवणारे नाहीत आणि वेगवान गोलंदाज लांबून पळत येण्याचा अभिनय करत असले, तरी मारा कमी वेगानेच करतात हे माहीत आहे. भारतीय फलंदाजांना गेल्या सामन्यातील वेगाचा थरार मागे सोडून बांगलादेश संघाचा मुकाबला करायचा आहे. बांगलादेश संघ चांगला आहे आणि भारतीय संघ पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच विचार करून योजना आखून बांगलादेशसमोर मैदानात उतरेल, राहुल द्रविड म्हणाले.

हेही वाचा: IND vs BAN : भारताच्या आगामी सामन्यावर काळे ढग; उपांत्य फेरीचे समीकरण बिघडणार

गेले दोन दिवस अ‍ॅडलेड शहरात चांगलाच पाऊस पडत राहिल्याने खेळपट्टी तयार करायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. पावसाच्या भीतीने खेळपट्टीवरील आच्छादन दूर करणे कठीण झाले आहे. परिणामी भारत वि. बांगलादेश सामन्यासाठी खेळपट्टी नक्की कशी असेल याचा अंदाज कोणालाच येत नाहीय. चांगली बाब अशी आहे, की भारताच्या सामन्याअगोदर एक सामना त्याच खेळपट्टीवर होणार असल्याने अंदाज घेणे शक्य होणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारताने इनडोअर सुविधेचा वापर करत सराव केला.

असा आहे ॲक्युवेदरचा अंदाज

‘ॲक्युवेदर’ने अंदाजानुसार आज ३४ ते ५३ टक्य्यांपर्यंत पावसाचे भाकित केले आहे. सामना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे, परंतु ५ वाजल्यापासूनच पावसास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.