Ind vs Neth : आज सिडनीत लढत, प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चुक करणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T-20 World Cup 2022 India vs Netherlands

Ind vs Neth : आज सिडनीत लढत, प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चुक करणार नाही

T-20 World Cup 2022 India vs Netherlands : झाले गेले विसरून जाऊन लक्ष पुढील सामन्यावर केंद्रित करणे गरजेचे असते ही गोष्ट भारतीय संघ जाणून आहे. मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयाचा थरार मागे सोडून आता भारतीय संघ गुरुवारी नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. फुटबॉल, हॉकी व ॲथलेटिक्स साठी ओळखल्या जाणाऱ्या या युरोपियन संघाला कमी लेखण्याची चुक न करता संपूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवण्याचा विचार भारतीय संघाने पक्का केला गेला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे ओझे मनावरून उतरल्याने खेळाडू आणि चाहते दोघांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. त्या सामन्यातील विराट कोहलीच्या खेळाची रास्त स्तुती होत असताना गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचे व्हायला पाहिजे तितके कौतुक झालेले नाही. ‘टी२० प्रकार जास्त करून फलंदाजांचा समजला जातो. पण मला वाटते एखाद्या गोलंदाजाने एक षटक चांगले टाकले किंवा गरजेच्या क्षणी दोन चेंडू कमाल टाकले तरी त्याचा मोठा परिणाम सामन्यावर होतो. आम्ही हे जाणतो म्हणून संघाच्या बैठकीत गोलंदाजांचे योग्य कौतुक होते.

हेही वाचा: IND vs NED Playing-11: रोहित शर्मा 'या' खेळाडूला देणार विश्रांती! जाणून घ्या प्लेइंग-11

पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने साडे पाचच्या सरासरीने धावा देत चार षटके मस्त मारा केला, शमीचा स्पेल जबरदस्त होता. हार्दिक आणि अर्शदिपच्या प्रत्येकी ३ बळींना मोठे महत्त्व आहे. गोलंदाजांची कामगिरी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात संघ कमी पडत नाही. कदाचित माध्यमे आणि चाहते थोडे लक्ष देऊ लागले तर बदल होईल’, असे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेने स्पष्ट केले.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्याबद्दल पारस म्हांब्रे म्हणाला, ‘वर्ल्ड कप पात्रता फेरीचे सामने बघता सगळे जाणून आहेत की कोणताही संघ कमजोर नाही. सगळे जबरदस्त कामगिरी करून स्पर्धेत सहभागी झाले आहेत. भारतीय संघ एका वेळी एका सामन्याचा विचार करत आहे. त्या अर्थाने पाकिस्तान विरुद्धचा सामना होऊन गेला हे बरे आहे.

हेही वाचा: IND vs NED Weather : इंग्लंड-न्यूझीलंडनंतर पाऊस भारताचा खेळ करणार खराब!

आता त्या सामन्यात काय झाले याचा जास्त विचार न करता पुढील सामन्याच्या तयारीला लागायचे आहे. सगळे खेळाडू प्रत्येक सामना खेळायला कमालीचे उत्सुक आहेत. कोणालाही दुखापत नाही की विश्रांतीची मागणी नाही’, असे पारस म्हांब्रे म्हणाला.

तसे बघायला गेले तर भारताच्या गटातील सर्वात कमी तयारीचा संघ नेदरलँडचा आहे. तरीही भारतीय संघ दुसरा सामना आरामात घ्यायला तयारी नाही. कारण संघाला हाती आलेली चांगल्या खेळाची लय घट्ट पकडून ठेवायची आहे. नेदरलँड समोरच्या सामन्यात सलामीच्या जोडीचा चांगला खेळ आणि शेवटच्या पाच षटकांच्या गोलंदाजीतील सुधारणा या दोन गोष्टींकडे संघ व्यवस्थापन लक्ष ठेवणार आहे. बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना झाल्यावर त्याच खेळपट्टीवर भारताचा सामना होणार असल्याने खेळपट्टीच्या ताजेपणाचा विषय संपलेला असेल. फक्त बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका कसे खेळतात हे मात्र भारतीय संघ बारकाईने बघेल हे नक्की.

हेही वाचा: Virat Kohli : सदगुरुंनी केलं विराटचं कौतूक, त्याच्यात एक गोष्ट खास! ती म्हणजे...

हार्दिक पांड्या हा ठणठणीत असून तो खेळण्यासाठी फिट आहे. उद्याच्या सामन्यासाठी आम्ही कोणालाही विश्रांती देणार नाही. आम्हाला स्पर्धेत आता लय सापडली आहे. खेळाडूंचा वैयक्तिक फॉर्म देखील महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या सगळे सामने खेळू इच्छितो. आम्ही कोणाला विश्रांती द्यायची याबाबत अद्याप विचार केलेला नाही. पांड्या आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आमच्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करतोय. याचबरोबर त्याचा मैदानावरील वावर देखील तितका महत्त्वाचा आहे.

- पारस म्हांब्रे, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक

भारताविरुद्ध खेळताना मला माझ्या संघाकडून अनावश्यक किंवा जास्तीची अपेक्षा नाही. फक्त खेळाडूंनी जास्तीत जास्त चांगला खेळ करावा, ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने जी कामगिरी केली ती न विसरण्यासारखी असून त्या कामगिरीची पुनरावृत्ती त्याने आमच्याविरुद्ध करू नये.

- स्कॉट एडवर्ड, कर्णधार, नेदरलँड